धनंजय मुंडे यांचे समर्थक आक्रमक, पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या

0

बीड,दि.5: बीडमध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. मुंडे समर्थकांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. सरपंच संजय देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली होती. तसेच भाजपा आमदार सुरेश धस यांनीही मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. परभणीत निघालेल्या मोर्चातही मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. 

संतोष देशमुख यांना न्याय मिळाला म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. 

पोलीस ठाण्यात गेल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला. याचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. यापुढे जर देशमुख कुटुंबीयांना धक्का लागला, तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. 

बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मुंडे समर्थकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच खासदार बजरंग सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

पोलिस ठाण्या बाहेर मुंडेंचे शेकडो समर्थक एकत्र आले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात आक्षेपर्ह वक्तव्य केल्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण पोलिस स्टेशन सोडणार नाही अशी भूमीकाच मुंडे समर्थकांनी घेतली आहे. अशा स्थितीत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जातीय रंग येतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here