सोलापूर,दि.२५: ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जात्मक व लोकभिमुख आरोग्यसेवा मिळाव्यात, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरवळ (तालुका: अक्कलकोट) येथे २३ व २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान ‘सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा’ (CPHC) दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला.
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपरवाड आणि पुणे येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुहास कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध तज्ज्ञांनी आरोग्य क्षेत्रातील १४ प्रमुख विषयांवर मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील घटकांचा समावेश होता:
१. गर्भारपण, प्रसूर्ती व प्रसूतीनंतरची काळजी
२. नवजात शिशु आणि अर्भक आरोग्यसेवा
३. बाल आणि किशोरवयीन आरोग्य
४. कुटुंब नियोजन व गर्भनिरोधक सेवा
५. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व संसर्गजन्य आजार व्यवस्थापन
६. सामान्य संसर्ग व किरकोळ आजारांचे व्यवस्थापन
७. असंसर्गजन्य आजारांचे निदान व प्रतिबंध
८. कान आणि डोळ्यांची प्राथमिक काळजी
९. मुख आरोग्याची (Oral Health) मूलभूत काळजी
१०. वृद्धापकाळातील आरोग्य व वेदनाशामक (Palliative) काळजी
११. आपत्कालीन वैद्यकीय सेवा (Emergency Care)
१२. मानसिक आरोग्य व समुपदेशन
१३. योग आणि आयुष (AYUSH) उपचार पद्धतीचा वापर
१४. नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, महिलांचे आरोग्य व पुरुषांचा सहभाग
प्रशिक्षण दरम्यान CPHC अंतर्गत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा पुरवणे तसेच आरोग्य केंद्रांची गुणवत्ता कशी वाढवावी, यावर सविस्तर चर्चा झाली. या अद्ययावत ज्ञान आणि कौशल्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रभावी व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होईल.
या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. रोहन वायचळ, डॉ. साधना पाटील, डॉ. शबनम शेख, प्रशिक्षक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवलीला माळी, आरोग्य सहायिका कलावती चव्हाण, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे शाखा सदस्य रफिक शेख यांच्यासह समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








