Home देश सत्ताविरोधी लाट असतानाही भाजप प्रत्येक निवडणूक कशी जिंकते?

सत्ताविरोधी लाट असतानाही भाजप प्रत्येक निवडणूक कशी जिंकते?

0

नवी दिल्ली,दि.२५: देशामधील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) भूमिकेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील निकालप्रक्रियेवर शंका उपस्थित करत, “तीव्र सत्ताविरोधी वातावरण (Anti-incumbency) असतानाही भाजप सर्वच निवडणुका कशा काय जिंकतो?” असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.  

निवडणुकांमध्ये गडबड करून मतदारांचा जनादेश चोरणाऱ्यांवर आणि या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर आज ना उद्या कायदेशीर कारवाई होणारच, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.  

ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी

देशात मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी आणि ‘वोट चोरी’ सुरू असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. नागरिकांचे मत योग्य ठिकाणी नोंदवले जात आहे की नाही, हे पाहण्याची मुख्य जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची होती. मात्र, त्यांनी निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घडवून आणला असून, हे कृत्य देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीवर झालेला थेट हल्ला आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांनी एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.  

आयोगातील अंतर्गत मतभेदांचा हवाला

निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर बोट ठेवताना ते म्हणाले, “लोकशाहीच्या पायावर घाला घालणाऱ्या या कारस्थानाला ज्ञानेश कुमार जबाबदार आहेत. आयोगातील अन्य दोन निवडणूक आयुक्तांनीच ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर वारंवार आक्षेप नोंदवले आहेत. यामुळे विरोधी पक्षांचा संशय खरा ठरला असून, २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची हेराफेरी झाल्याचे स्पष्ट होते.”  

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्यावर थेट निशाणा

या संपूर्ण प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट आरोप केले. “ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीच केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य सूत्रधार तेच असून ज्ञानेश कुमारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा दावा करत राहुल गांधी यांनी या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.  

“मतांची चोरी आणि लोकशाहीचे अपहरण खपवून घेणार नाही”

लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये केंद्र सरकारविरोधात स्पष्ट असंतोष दिसून येत होता. मात्र, त्यानंतर लागलीच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हा जनक्षोभ अचानक गायब कसा झाला? असा सवाल करत त्यांनी हे लोकशाहीचे अपहरण असल्याचा पुनरुच्चार केला. मतांची चोरी ही देशातील कायद्याची आणि संस्थांची चोरी असून, संविधान आणि जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष राज्यघटनेच्या रक्षणासाठी देशव्यापी लढा उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.