Cleric Video: मौलवींनी रमजानची नमाज पठण करत असताना मांजराबरोबर जे केलं ते मन जिंकणारं

0

नवी दिल्ली, दि.7: Cleric Video: सोशल मीडियावर मौलवींचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांनी मौलवींचे कौतुक केले आहे. रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. यानिमित्ताने जगभरातील इस्लाम धर्माचे अनुयायी ईश्वराचं स्मरण करण्यात मग्न आहेत. या महिन्यात रोजा ठेवणं, 5 वेळा नमाज अदा करणं सामान्य आहे. सध्या सोशल मीडियावर मुस्लिमांच्या रमजान आणि इफ्तारीशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. परंतु नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने सर्वांचं मन जिंकलं आहे. या व्हिडिओमध्ये एक मांजर नमाज पठण करणाऱ्या मौलवींच्या अंगावर उडी घेताना दिसते. यानंतर मौलवी जे काही करतात ते मन जिंकणारं आहे.

मौलवी नमाज अदा करत असताना | Cleric Video

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ अल्जीरियाच्या मौलवींचा आहे, जे नमाज अदा करताना दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे अनेक लोक उभे राहिलेले दिसतात. अचानक एक मांजर मौलवींजवळ येते आणि बराच वेळ त्यांच्या पायांभोवती खेळताना दिसते. यानंतर ती अचानक मौलवींच्या अंगावर उडी घेते. त्यांचे डोळे बंद आहेत, अशावेळी आपल्या अंगावर मांजर उडी मारत आहे, याचा अंदाजही त्यांना नव्हता. अचानक असं काही झाल्यावर सहाजिकच कोणीही घाबरतं किंवा काही लोकांना याचा रागही येतो. पण मौलवींनी असं काही केलं नाही. उलट त्यांची प्रतिक्रिया अशी होती की लोक त्यांचं कौतुक करू लागले.

मांजरीने त्यांच्या अंगावर उडी मारूनही त्यांचे हावभाव अजिबात बदलत नाहीत. ते मांजरीच्या अंगावरुन अतिशय प्रेमाने आपला हात फिरवताना दिसतात. तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओच्या सुरुवातीला मांजर त्यांच्या पायाजवळ दिसत आहे. मग ती खाली उभी राहते आणि त्यांच्यावर चढण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या कपड्यांना तिच्या पायाने स्पर्श करते. यानंतर काहीच वेळात ती थेट मौलवींच्या हातावर उडी मारते आणि इथून मग त्यांच्या खांद्यावर चढते. मौलवीदेखील मांजरीला आपल्या हातांनी पकडून नमाज पठण करत राहतात.

फेसबुकवरील शेख वालिद मेहसास यांच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. याला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी लाईक करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअरही केला जात आहे. सर्वजण मौलवींचं कौतुक करत आहेत, तसंच मांजराबद्दल त्यांनी दाखवलेल्या आपुलकीचं कौतुक करत आहेत. एकाने यूजरने कमेंट करत म्हटलं की “मला या व्हिडिओमधील सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे मौलवींची नम्रता आणि त्यांची प्रार्थनांमधील दृढता, अल्लाह त्यांचे रक्षण करो.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here