मुंबई,दि.१५: भाजपा उपमुख्यमंत्र्याची उद्धव ठाकरे यांना मोठी ऑफर दिली आहे. शिवसेनेने युती तोडल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतील अंतर्गत बंडामुळे राज्यात सत्तांतर झाले व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष व चिन्ह मिळाले.
‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरणं तापलं आहे. जाहिरातीमुळे भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच भाजपा नेत्याने शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मैत्रीची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपा उपमुख्यमंत्र्याची उद्धव ठाकरे यांना मोठी ऑफर
मोदी@ ९ महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं उघडीच आहेत,” असं मौर्य म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य?
“उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील, तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी. भाजपाचे दरवाजे बंद नसतात. भाजपाचे दरवाजे उघडीच असतात. पण, उद्धव ठाकरेंना चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. भाजपा चर्चेचा प्रस्ताव ठेवणार नाही. कारण, त्यांनी चूक केली आहे, भाजपाने चूक केली नाही,” असं मौर्य यांनी सांगितलं.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मौर्य यांनी महागाई वाढली असल्याचं म्हटलं. “मागील साडे तीन वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० कोटीहून अधिक नागरिकांना रेशन दुकानावर मोफत अन्नधान्य देण्याच काम केलं आहे. शेतकर्यांना केंद्राकडून ६ हजार आणि राज्य सरकार ६ हजार अशी एकूण १२ हजारांची मदत दिली जात आहे. तर, दुसर्या बाजूला देशात निश्चित महागाई वाढली आहे. ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयत्न करीत आहे.”