Anti Conversion Law: बोम्मई सरकारने बनवलेला धर्मांतरविरोधी कायदा सिद्धरामय्या सरकारने केला रद्द

0

बंगळुरू,दि.15: Anti Conversion Law: धर्मांतर विरोधी कायदा कर्नाटक काँग्रेस सरकारने रद्द केला आहे. नुकत्याच कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले होते. कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर येताच धर्मांतर विरोधी कायदा मागे घेण्यात आला आहे. हा कायदा भाजप सरकारने आणला होता. यानंतर आता तेथील काँग्रेस सरकार गोहत्या प्रतिबंधक कायद्यातील कठोर तरतुदीही सौम्य करू शकते, अशी चर्चा आहे. आज झालेल्या सिद्धरामय्या सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळिराम हेडगेवार यांनाही शाळांच्या अभ्यासक्रमातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Anti Conversion Law | धर्मांतरविरोधी कायदा रद्द

सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने मागील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेला धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजूर केला. या प्रस्तावाला गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी दिली.

आधीच्या भाजप सरकारने एका अध्यादेशाद्वारे याची अंमलबजावणी केली आणि नंतर तो सभागृहात आणला. तत्कालीन सरकारने आणलेल्या या कायद्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष झाला होता. काँग्रेसने या कायद्याला अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्याचे हत्यार म्हटले होते.

“यासंदर्भात बोलताना, कर्नाटकचे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा म्हणाले, ‘हेडगेवारांसंदर्भात शाळेच्या अभ्यासक्रमात जे काही देण्यात आले होते, ते काढण्यात आला आहे. गेल्या सरकारने जे काही बदल केले आहेत, ते परत घेण्यात आले आहेत. आता तेच शिकवले जाईल जे यापूर्वी शिकवले जात होते.”

याशिवाय कॅबिनेटने आणखी एक निर्णय घेतला आहे, बिगर शासकीय आणि अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेची प्रस्तावना वाचणे बंधनकारक असेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here