मुंबई,दि.26: Bihar Political Crisis: भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे 10 हून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. बिहारच्या राजकारणात सध्या चांगलाच गोंधळ सुरू आहे. आरजेडी आणि जेडीयू युती तुटण्याच्या मार्गावर असताना नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, अशी चर्चा आहे.
बिहारमध्ये राजकीय संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच काँग्रेसबाबत मोठे दावे केले जात आहेत. काँग्रेसचे अनेक आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे बिहारमधील काँग्रेस आमदारांवरही भाजपची नजर आहे. या स्थितीमुळे राज्यात भाजप मजबूत होईल, असे दावे केले जात आहेत.
काँग्रेसचे 10 हून अधिक आमदार संपर्कात | Bihar Political Crisis
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे 10 हून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आहे की भाजपची नजर बिहारमधील काँग्रेस आमदारांवर आहे आणि दहा आमदार वेगळे होऊन स्वतःचा गट स्थापन करू शकतात. दुसरीकडे, भाजप आपल्या अटींवर नितीशकुमार यांच्याशी तडजोड करेल, भाजपच्या सर्व विद्यमान मित्रपक्षांची काळजी घेतली जाईल.
बिहार भाजपचे प्रमुख सम्राट चौधरी यांची सुशील कुमार मोदी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासमवेत दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये, गृहमंत्री अमित शहांसोबत ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचेही समजते. दुसरीकडे काँग्रेसमधील 10 आमदारही भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे, लवकरच बिहारमध्ये राजकीय सत्तांतराचे नाट्य पाहायला मिळू शकते. बिहारमध्ये काँग्रेसकडे 19 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी, 10 आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे.
पुत्र तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसाद यादव हेही आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आरजेडीलाही अवघ्या काही आमदारांची आवश्यकता आहे. एमआयएम, हम पार्टी यांच्या मदतीने लालू प्रसाद यादव यांनी हा आकडा १२० वर नेला असून त्यांना आता केवळ दोन आमदारांची गरज भासणार आहे. त्यासाठी जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.