सोलापूर,दि.६: तीन जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात आरोपी अमर साखरे, ओमकार साखरे, दीपक साखरे, सागर साखरे आणि यतिराज साखरे (सर्व रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) या सर्व आरोपींचा जामीन सोलापूर येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.
घटना आणि पार्श्वभूमी:
दिनांक १६ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरात बसले होते आणि त्यांचा धाकटा भाऊ घरासमोरील पोर्चमध्ये बसला होता. त्या वेळी फिर्यादीच्या शेजारी राहणारे अमर वसंत साखरे, वसंत कृष्णात साखरे, ओंकार वसंत साखरे, यतीराज सुखदेव साखरे आणि दीपक विश्वनाथ साखरे हे घरासमोर आले. त्यांनी फिर्यादीच्या भावाला “बाहेर ये, तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हटले. फिर्यादीला संशय आल्याने त्यांनी भावाला बाहेर जाण्यास मनाई केली आणि हे लोक भांडण करण्यासाठी आले असल्याचे सांगत लागलीच वडिलांना फोन करून घरी बोलावून घेतले.
फिर्यादीचा भाऊ बाहेर आला नाही म्हणून ते सर्वजण मागे फिरले. काही वेळाने हातात हत्यारे घेऊन ते पुन्हा फिर्यादीच्या घरासमोर आले. “आमच्यावर केस का केली? तुम्हाला आता जिवंत सोडत नाही. बाहेर या, नाहीतर आत आलो तर गाठ आमच्याशी आहे,” असे म्हणत त्यांनी मोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हल्ला आणि मारहाण:
तेवढ्यात फिर्यादीचे वडील घरी आले. फिर्यादी आपल्या भावासह घराबाहेर आले आणि “आम्हाला शिवीगाळ का करता?” असे विचारून समजावून सांगत होते. त्याच वेळी यतीराज साखरे याने वडिलांची गच्ची धरून हातातील सत्तुराने त्यांच्या डोक्यात वार केला, तर अमर साखरे याने पाठीमागून डोक्यात गज मारला.
त्याच वेळी अमर साखरे, सुखदेव साखरे, यतीराज साखरे, विश्वनाथ साखरे, दीपक साखरे, वसंत साखरे आणि सागर साखरे यांनी फिर्यादीच्या भावाला मध्यभागी घेरले. “याला जिवंत सोडायचे नाही” असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील कोयता, लोखंडी सळई, रॉड आणि काठ्यांनी त्याला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.
फिर्यादी सोडवासोडवी करण्यासाठी मध्ये पडले असता, त्यांनाही खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचा चुलत भाऊ मध्यस्थीसाठी आला असता, अमर साखरे याने बांबूच्या काठीने त्याच्या पाठीवर व पोटावर मारहाण केली. ओंकार साखरे व दीपक साखरे यांनी लोखंडी सळईने त्याच्या पाठीवर आणि पायावर मारहाण केली, तर वसंत साखरे याने कोयत्याने त्याच्या डोक्यात मारले.
याशिवाय, फिर्यादीच्या चुलतीला अमर साखरे, वसंत साखरे आणि यतीराज साखरे यांनी कोयता व सळईने मारहाण केली. शामल बनसोडे, आशा साखरे आणि मीना साखरे यांनी त्यांच्या अंगावर व डोक्यात तिखट (चटणी) टाकून चापटांनी मारहाण केली. फिर्यादीच्या चुलत्यांना दीपक साखरे, अमर साखरे आणि मीना साखरे यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खाली पाडले. “यापुढे जर आमच्या नादाला लागलात, तर जिवे मारू,” अशी धमकी देत आरोपी सर्व हत्यारे घेऊन निघून गेले. या घटनेबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयातील युक्तिवाद आणि जामीन मंजूर:
या प्रकरणी अमर साखरे, ओमकार साखरे, दीपक साखरे, सागर साखरे आणि यतिराज साखरे यांनी ॲड. अभिजित इटकर यांच्यामार्फत सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
बचाव पक्षातर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, मुख्य आरोपी व फिर्यादी यांच्यात जुना वाद असून, केवळ आरोपींवर दबाव आणण्याच्या उद्देशाने ही केस करण्यात आली आहे.
न्यायालयाने बचाव पक्षाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणी आरोपींतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. नागेश मेंडगुदले, ॲड. फैयाज शेख, ॲड. सुमित लवटे आणि ॲड. तुषार सिरसट यांनी कामकाज पाहिले.








