सोलापूर,दि.11 : जननी आणि जन्मभूमी ही निर्मितीची केंद्रे आहेत. जी निर्मिती करू शकते ती कधीच अबला नसते. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. 12 व्या शतकात अक्कमहादेवींनी केलेले धाडस अतुलनीय आहे. व्यक्तीमुळे जेव्हा नवीन युगाची सुरुवात होते तेव्हा त्या व्यक्तीला युगपुरुष संबोधले जाते. तसेच अक्कमहादेवी या स्त्रीने बाराव्या शतकात नवीन युगाची सुरुवात केली. त्यांच्या विचारावरून व कार्यावरून त्या एक युग स्त्री असल्याचे सिद्ध होते. महायोगिनी अक्कमहादेवी या कादंबरीमुळे अक्कमहादेवी यांचे चरित्र समाजासमोर येण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी केले.
प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर लिखित, सुविद्या प्रकाशन प्रकाशित आणि वीरशैव व्हिजन आयोजित ‘महायोगिनी अक्कमहादेवी’ या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, साहित्यिका डॉ. स्मिता पाटील, अक्कनबळग महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा बावी, लेखिका व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर, सुविद्या प्रकाशनचे प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर व वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
लेखिका श्रुती वडगबाळकर यांनी कादंबरी लेखनाविषयीचे त्यांचे अनुभव सांगून या कादंबरीचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. स्मिता पाटील यांनी या कादंबरीचे वेगळेपण सांगून ही कादंबरी प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी वाचली पाहिजे असे सांगितले. कारण या कादंबरीतून केवळ अध्यात्मच नाही तर जीवन जगण्याचे साध्य नेमके काय आहे हेही दिसून येते असे स्पष्ट केले.
यावेळी साहित्यिका सुरेखा शहा, अरविंद जोशी, प्रा. भीमाशंकर बिराजदार, महेश अंदेली, जे. जे. कुलकर्णी, शोभा मोरे, दशरथ वडतीले, पद्माकर कुलकर्णी, अर्जुन व्हटकर, श्री.अवधूत म्हमाणे, डॉ.नसीमा पठाण , डॉ. अनिल सर्जे, चन्नवीर भद्रेश्वरमठ, रंजीता चाकोते, डॉ.सुहास पुजारी, अनेक नामवंत लेखक, उद्योजक, मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
सुरुवातीला राजशेखर बुरकुले यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव मैंदर्गीकर यांनी केले. लेखिका वंदना कुलकर्णी यांनी कादंबरी वरील अभिप्राय वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शुभदा उपासे-शिवपुजे यांनी केले तर आभारप्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश बडदाळ, विजयकुमार बिराजदार, संजय साखरे, राजेश नीला, महेश मैंदर्गीकर, मनोज पाटील, मेघराज स्वामी, महेश विभुते, संगमेश कंठी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, गौरीशंकर अतनुरे, अमोल कोटगोंडे यांनी परिश्रम घेतले.