मुंबई,दि.१: Ajit Pawar On PM Narendra Modi: झाले गेले गंगेला मिळाले, नवी पहाट नवीन सुरुवात या दृष्टीने आम्हाला पुढे जायचे आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे. नुकतेच निती आयोगाचे मुंबईत बैठक घेऊन पुढील विकास आराखडा बनवणार असल्याचे सांगितले. त्यावरून संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा आरोप केला. या आरोपाचा महायुतीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. जोपर्यंत चंद्र, सूर्य तारे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कुणाचा बापही करू शकत नाही अशा शब्दात अजित पवारांनी आव्हाड-राऊत यांना फटकारले आहे.
अजित पवार म्हणाले की, अलीकडेच निती आयोगासोबत बैठक झाली, काहीजण विकासाच्या बाबतीत बोलत नाही. राज्याचे हित कशात ते सांगत नाही. परंतु जातीजातीत धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करायचे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर न्यायची आहे असं पंतप्रधान सांगतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाते. निती आयोगाने देशात ४ शहरे निवडली आहे. टप्प्याटप्प्याने त्या शहरात वाढ होईल. मुंबई वेगळी करण्याचा डाव आहे असा आरोप केला जातो.
मी जे बोलतो ते खरे बोलतो, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करणं कुणाच्या बापाला शक्य नाही. काहीही सांगायचे आणि दिशाभूल करायची. अनेकदा याप्रकारचे आरोप केले गेले. निव्वळ जनतेची दिशाभूल केली जाते. तुम्ही विकासावर बोला, राज्याचे जनतेचे हित कशात त्यावर बोला. काही चुकत असेल तर ते दाखवा. काम करताना एखादी गोष्ट चुकली तर ताबोडतोब दुरुस्त करण्याची तयारी आहे. वाराणसी उत्तर प्रदेशातून, सुरत गुजरातमधून बाहेर काढायचे चालले आहे का? उद्या पुणे, पिंपरी चिंचवडचे नाव घेतले तर तेदेखील राज्यातून काढायचे असा आरोप करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
झाले गेले गंगेला मिळाले, नवी पहाट नवीन सुरुवात… | PM Ajit Pawar On Narendra Modi
तसेच मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करतो, त्याच्या वाटचालीचा आज सर्वात दिशादर्शक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशस्वी नेतृत्वात भारताची विकासाकडे घौडदौड सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. झाले गेले गंगेला मिळाले, नवी पहाट नवीन सुरुवात या दृष्टीने आम्हाला पुढे जायचे आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील भारतीयांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले हे सिद्ध झाले आहे. सर्वसामान्य घटकांपर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करतंय असंही अजित पवार म्हणाले.
मिशन ४८ संकल्प
महाराष्ट्रातील थांबलेली कामे अधिक वेगाने व्हावीत. राज्यभरात सर्व्हे करून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कुठेही काही कमी पडू देणार नाही. नैसर्गिक संकटे येतात, अतिवृष्टी होते, दुष्काळ पडतो, दरड कोसळते यासारख्या अनेक प्रसंगांना आम्ही सामोरे गेलोय, संकटे आली म्हणून डगमगायचं नसते. अधिक मजबुतीने पुढे जायचे असते. देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करून महाराष्ट्राची शक्ती त्यांच्यामागे उभी करायची आहे त्यासाठी मिशन ४८ संकल्प केला आहे असं अजित पवारांनी सांगितले.