उद्धव ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्राबाबत आदित्य ठाकरे यांनी दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.२७: उद्धव ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्राबाबत आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, संबंधित बातमीबाबत ठाकरे अथवा शिंदे गटातील कोणत्याही नेत्यानं अधिकृत स्पष्टीकरण दिलं नव्हतं. त्यामुळे निवडणूक आयोगानं ठाकरे गटाचे अडीच लाख प्रतिज्ञापत्रं खरंच बाद केली आहेत का? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण आता माजी मंत्री आणि शिवसेने नेते आदित्य ठाकरेंनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

संबंधित बातमी खोटी असून बातमीच्या स्त्रोतावर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याच्या वृत्ताबाबत विचारलं असता आदित्य ठाकरेंनी संबंधित बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्या बातमीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही आदित्य ठाकरेंनी केलं.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? हे देवालाच माहीत आहे, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात खरा मुख्यमंत्री कोण आहे, हेही देवालाच माहीत आहे. खोके सरकार निवडणुकीला तयार नाही, ते निवडणुकीला घाबरतात. ४० गद्दार आमदार खरंच निवडणुकीला घाबरत नसते आणि त्यांच्यासोबत जनमत असतं तर त्यांनी राजीनामे दिले असते आणि नव्याने निवडणुकीला सामोरे गेले असते, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here