रत्नागिरी,दि.20: पोलिसांनी मोर्चा काढल्या प्रकरणी दिवंगत माजी आमदार शामराव पेजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याचे कधी ऐकलं नसेल. आता घडणाऱ्या घटनेत सहभागी नसताना किंवा घटना घडताना ती व्यक्ती हयात नसताना त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचे कधी ऐकलं नसेल. रत्नागिरी शहर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची (FIR) जोरदार चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात मोर्चा काढल्याप्रकरणी कोकणचे, बहुजनांचे नेते अशी ओळख असलेल्या, तब्बल 45 वर्षे आमदार राहिलेल्या दिवंगत शामराव पेजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी हजारो नगारिकांनी मोर्चा काढला होता. ओबीसी संघर्ष समितीचा यामध्ये पुढाकार होता. त्यानंतर पोलिसांनी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या जवळपास 95 जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये कलम 141, 143, 149, 269 आणि 110 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी गुन्हा नोंदवलेल्या आरोपींच्या यादीत कोकणचे, बहुजनांचे लोकनेते अशी ओळख असलेले दिवंगत शामराव पेजे यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्याचं नाव पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये 90 व्या क्रमांकावर आहे. या गोंधळाबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी याचा इन्कार केला. दिवंगत शामराव पेजे यांच्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या स्पष्टीकरणानंतर एफआयआरमध्ये 90 व्या क्रमांकाचे आरोपी शामराव पेजे कोण, याची चर्चा जोरदार रंगली आहे.
कोण होते शामराव पेजे?
शामराव पेजे हे वर्ष 1945 ते 1990 अशी सलग 45 वर्षे आमदार होते. कोकणातील जनसंघर्षाचे त्यांनी अनेक वेळेस नेतृत्व केले आहे. त्याशिवाय ते आरडीसी बँकेचे चेअरमनदेखील होते. यमुनाबाई खेर ट्रस्टचे ते मुख्य विश्वस्त होते.