मुंबई,दि.६: पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिस्तरीय सुरक्षा करारामुळे पाकिस्तानचा नको तितका आत्मविश्वास वाढून तो पुन्हा भारताच्या खोड्या काढण्याची शक्यता आहे. मात्र, भारताने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अजून पूर्णपणे संपलेले नाही; पाकिस्तानने कोणतीही आगळीक केल्यास त्याला तीव्र शब्दांत आणि जशास तसे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशारा भारताचे माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अनिल चौहान यांनी दिला आहे.
नवी दिल्लीतील ‘तीन मूर्ती’ परिसरात आयोजित २२ व्या ‘भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत मेमोरिअल लेक्चर’ कार्यक्रमात बोलताना अनिल चौहान यांनी देशसमोरील सुरक्षा आव्हानांवर भाष्य केले.
मक्का करारातून वाढणारा धोका
गेल्या ७ ऑगस्ट रोजी पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया यांच्यात ‘मक्का संयुक्त सुरक्षा करार’ पार पडला. या करारानुसार, तिन्हीपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला झाल्यास तो तीनही देशांवरील संयुक्त हल्ला मानला जाईल. पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन हा करार करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी यामुळे पाकिस्तानच्या मनात भारतविरोधी फाजील आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो आणि तो चुकीचे पाऊल उचलण्याची भीती चौहान यांनी व्यक्त केली.
‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) आणि पाकिस्तानचे वर्तन
गेल्या वर्षी मे महिन्यात भारताने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) आणि सिंधू पाणी कराराबाबत घेतलेले कठोर निर्णय यामुळे पाकिस्तानच्या भूमिकेत सुधारणा होण्याची अपेक्षा होती. परंतु, पाकिस्तान आपले भारतविरोधी धोरण सहजासहजी सोडणारा नाही. त्यामुळे भारताने नेहमी अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे.
अनिल चौहान यांनी स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) हे केवळ एका टप्प्यापुरते मर्यादित नसून ते अजूनही सुरूच आहे. जर पाकिस्तानने पुन्हा कोणतीही नापाक हरकत केली, तर भारताची तिन्ही सैन्यदले त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.








