सोलापूर,दि.११: बोरामणी येथील शेतीच्या वादातून आणि पैशाच्या कारणावरून झालेल्या तिहेरी खून प्रकरणातील आरोपी सचिन शिवाजी वाघमारे आणि सूरज महादेव मोरे यांचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी मंजूर केला.
या घटनेची हकीकत अशी की, मुख्य आरोपी शंकर मस्के याचा भाऊ सुधाकर मस्के याचा सुमारे पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर शंकर मस्के आणि सुधाकर मस्के यांची पत्नी गायत्री यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू होता. त्यामुळे शंकर हा गायत्रीवर चिडून होता. तसेच गायत्रीच्या पतीने पूर्वी जमीन विकली होती. त्या शेतजमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेतील २५ लाख रुपये गायत्रीने दीर शंकर मस्के याला हातउसने दिले होते. ती रक्कम गायत्री शंकरकडे मागत होती. त्यावेळी शंकर ‘घेतलेले पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर’ असे सांगून तिला जीवे मारण्याची धमकी देत असे.
फिर्यादी अधूनमधून गायत्रीकडे येत-जात असताना गायत्रीने त्याला या प्रकाराबाबत सांगितले होते. २ मे २०२६ रोजी दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गावात असताना गावातील पिंटू जाधव याने त्याला सांगितले की, “तुझी बहीण गायत्री आणि तिच्या दोन्ही मुलांना कोणीतरी ठार मारले आहे. तुला याबाबत काही माहिती मिळाली आहे का, तू खात्री करून घे.” त्यामुळे फिर्यादीने गायत्रीच्या मोबाईलवर फोन केला असता तो बंद येत होता. त्यानंतर शंकर मस्के याला फोन केला असता त्याचाही फोन बंद लागत होता.
फिर्यादीने त्याच्या मावसभावाला फोन लावून विचारणा केली असता त्याने ही घटना खरी असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादी त्वरित छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), सोलापूर येथे आला. तेथे चर्चेतून त्याला समजले की, शंकर उर्फ पप्पू मस्के याने त्याची बहीण गायत्री, भाची प्रियंका आणि भाचा शिवराज यांच्यावर तलवारीने वार करून त्यांना ठार मारले आहे. याप्रकरणी दिलीप विश्वनाथ चांदोरे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्रस्तुत गुन्ह्यात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर यातील अटक आरोपी सूरज मोरे आणि सचिन वाघमारे यांनी वकील संतोष न्हावकर यांच्यामार्फत सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
न्यायालयात आरोपींतर्फे युक्तिवाद करताना वकील संतोष न्हावकर यांनी सांगिले की, “फिर्याद दाखल करतेवेळी या आरोपींनी मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याला मदत केल्याचा आरोप होता, तर दोषारोपपत्रात त्यांनी मुख्य आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा विसंगत उल्लेख आहे. पोलिसांनी याविरोधात कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही.” हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणात आरोपींच्या बाजूने ॲड. संतोष न्हावकर, ॲड. राहुल रूपनर, ॲड. मीरा पाटील आणि ॲड. शिवरत्न माने यांनी काम पाहिले.








