सोलापूर,दि.११: अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात समोर आला आहे. “तुझ्या आमदाराला गोळ्या घालून उडव, मी तुला पैसे देतो, पुढचे मी बघतो,” अशी थेट ऑफर देणाऱ्या श्रीशैल हुळ्ळी आणि प्रभाकर फुलारी यांच्याविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रभाकर फुलारी याला अटक केली असून, मुख्य आरोपी हुळ्ळीचा शोध घेतला जात आहे.
महावीर चौकातील शोरूमबाहेर घडली घटना
आमदार कल्याणशेट्टी यांचे चालक आनंद स्वामीराव सुरवसे (रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट) हे ७ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास आमदारांची पत्नी आणि मुलाला घेऊन सोलापूर शहरातील महावीर चौकातील एका शोरूममध्ये खरेदीसाठी आले होते. कुटुंब खरेदीसाठी आत गेले असताना सुरवसे हे बाहेर वाहनाजवळ थांबले होते.
त्याच वेळी संशयित आरोपी श्रीशैल हुळ्ळी आणि प्रभाकर फुलारी तेथे आले. हुळ्ळी याने सुरवसे यांना पैशांचे आमिष दाखवून आमदारांना संपवण्यास सांगितले. याच वेळी दुसरा आरोपी प्रभाकर फुलारी याने, “साहेब काय सांगतायत ते नीट ऐक, त्यातच तुझा फायदा आहे,” असे म्हणत सुरवसे यांना फूस लावण्याचा प्रयत्न केला.
फुलारीला पोलीस कोठडी; हुळ्ळीच्या शोधासाठी चार पथके
घटनेनंतर दोन दिवसांनी चालक सुरवसे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रभाकर फुलारी (रा. मल्लिकार्जुन नगर, सोलापूर) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत करत आहेत. मुख्य आरोपी श्रीशैल हुळ्ळी हा अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी चार विशेष पथके रवाना केली आहेत. आरोपींचा नेमका हेतू काय होता आणि या षड्यंत्रामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास केला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले.








