सोलापूर,दि.२२: विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक दर्शन रांगेत उभा राहतो. सामान्य भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र “वारकरी हाच व्हीआयपी” या भूमिकेतून प्रशासनाचा पुढाकार दिसून येत आहे.
अशातच पंढरपूरच्या दर्शन रांगेत दोन वयोवृद्ध भाविक शारीरिक अडचणी सांभाळत उभे असल्याचे दिसून आले. त्यांची अवस्था लक्षात घेऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी त्यांना रांगेतून बाहेर काढत थेट विठ्ठलाचे दर्शन घडवले.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे सामान्य भाविकांना अधिक सुलभ आणि जलद दर्शन मिळत आहे. ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही “वारकरी हाच व्हीआयपी आहे” असे सांगत, वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
सध्या विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत पोहोचली आहे. हजारो वारकरी भक्तिभावाने रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत. मात्र वयोवृद्ध आणि अशक्त भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे संबंधित भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.








