Home शेती शेतकऱ्यांचे तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन; घामाचा पैसा मातीत, आता तरी मदतीचा...

शेतकऱ्यांचे तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन; घामाचा पैसा मातीत, आता तरी मदतीचा हात द्या!

0

विशेष प्रतिनिधी, अक्कलकोट,दि.१२: चालू खरीप हंगामात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे अक्कलकोट तालुक्यातील किणी मंडळांतर्गत येणाऱ्या मौजे किणीवाडी परिसरातील सोयाबीन, उडीद व इतर खरीप पिके जागेवरच १००% करपून खाक झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

बाधित पिकांचे गांभीर्य लक्षात घेऊन किणी मंडळ परिसरात तातडीने सरसकट दुष्काळ जाहीर करावा, चालू हंगामाची विमा भरपाई मंजूर करावी आणि मागील वर्षाचा थकीत पीक विमा बँक खात्यात त्वरित जमा करावा, या प्रमुख मागण्यांचे सविस्तर निवेदन किणीवाडी येथील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना अधिकृतपणे सादर करण्यात आले.

पिकांवरील खर्च मातीत

किणी मंडळ परिसरात सुरुवातीला वेळेवर पेरण्या पार पडल्या. किणीवाडी शिवारातील शेतकऱ्यांनी उसने-पासने करून तसेच कर्ज काढून नांगरणी, मशागत, महागडी रासायनिक खते, औषधे आणि बियाण्यांवर एकरी १५ ते २० हजार रुपयांपर्यंत खर्च केला होता. सुरुवातीला पिके जोमात आली; मात्र त्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दांडी मारली. जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपल्याने उभी पिके डोळ्यादेखत करपून वाळून गेली. आज किणी मंडळातील शिवारात एका दाण्याचेही उत्पादन मिळण्याची शक्यता उरलेली नाही, अशी अत्यंत विदारक स्थिती प्रत्यक्ष शेतात निर्माण झाली आहे.

मागील पीक विमा प्रलंबित

किणी मंडळातील शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामात नियमित विमा हप्ता भरला होता. तरीही नुकसान भरपाई आजतागायत बँक खात्यांवर जमा करण्यात आलेली नाही, अशी तीव्र खंत शेतकऱ्यांनी निवेदनातून व्यक्त केली. तांत्रिक कारणांची ढाल पुढे करत विमा कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. मागील थकीत रक्कम मिळालेली नसतानाच चालू वर्षीची पिकेही पूर्णतः नष्ट झाल्याने बळीराजा आर्थिकदृष्ट्या पार कोलमडला आहे.

प्रमुख मागण्या:

किणी मंडळ व किणीवाडी परिसरासह अक्कलकोट तालुक्यात पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, तात्काळ सरसकट दुष्काळ जाहीर करून हेक्टरी भरीव आर्थिक मदत द्यावी.

मागील वर्षाचा थकीत खरीप पीक विमा संबंधित विमा कंपनीकडून विनाविलंब शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वर्ग करण्याचे आदेश द्यावेत.

चालू खरीप हंगामातील पिकांचे १००% नुकसान ग्राह्य धरून या वर्षाची विमा भरपाई तात्काळ मंजूर करून वितरित करावी.

तातडीने कार्यवाहीची मागणी

प्रशासनाने कागदी आकडेमोड न करता किणी मंडळातील किणीवाडी येथील शेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक आणि तातडीने विचार करावा, अशी कळकळीची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.

याप्रसंगी किणी मंडळातील किणीवाडी गावातील बाधित शेतकरी बांधव, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.