मुंबई,दि.१७: मंगळवारी सकाळी मोहालीतील अनेक खाजगी आणि सरकारी शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने पुन्हा एकदा पंजाब हादरले. ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की शाळा, तसेच मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यामुळे आधीच कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
धमकी मिळताच, जिल्हा प्रशासन आणि पोलिस सतर्क झाले. खबरदारी म्हणून, सर्व शाळा तात्काळ बंद घोषित करण्यात आल्या. शाळेत आलेल्या मुलांना त्यांच्या पालकांना कळवून परत पाठवण्यात आले. शाळेच्या बसेसचे रस्त्यातचे मार्ग वळवण्यात आले. शाळा व्यवस्थापनाने पालकांना संदेश पाठवून त्यांच्या मुलांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचे आवाहन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ई-मेलमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि चिंताजनक मजकूर लिहिण्यात आला आहे. “भाई दिलावर सिंग यांच्या वारसांनी मान यांना ‘पोलोनियम’ या विषारी रेडिओएक्टिव्ह पदार्थाने संक्रमित केले आहे,” असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, “जर ते वाचले, तर त्यांचा हाल माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्यासारखा केला जाईल. फोर्टिस रुग्णालयातून मुख्यमंत्र्यांचा मृतदेहच बाहेर निघेल,” अशी टोकाची धमकी देण्यात आली आहे.








