सोलापूर,दि.2: नवीन प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराचा खून प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने विकास गावडे यास जामीन मंजूर केला आहे. लक्ष्मण येताळा व्हळगुंडे वय 45,रा. औंढी ता. मोहोळ जि. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी विकास रेवप्पा गावडे वय 29 राहणार वाघोली तालुका मोहोळ यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, यातील मयताचे एका गावातील महिला आरोपीशी प्रेम संबंध होते, गेली सहा महिन्यापासून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे महिलेने मयतासोबत असलेले प्रेम संबंध बंद केले होते, त्यादरम्यान तिचे आरोपी सौरभ गावडे यांच्याबरोबर प्रेम संबंध जोडले गेले होते. परंतु मयत हा महिलेचे ऐकत नव्हता व तिच्याकडे जात होता.
दि.19/03/2023 च्या मध्यरात्री आरोपी छाया वाघमोडे तिचा नवीन प्रियकर सौरभ गावडे व सौरभचा चुलत भाऊ विकास गावडे या तिघांनी मयत लक्ष्मण याचा खून करून त्याचे प्रेत रस्त्याच्या कडेला टाकून निघून गेले. घटनेबाबतची फिर्याद मयताचा भाऊ हरी येताळा व्हळगुंडे याने कामती पोलीस ठाणे येथे दिली होती.
त्यावर आरोपी विकास याने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर आरोपीने जामीन मिळण्यासाठी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील ॲड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात आरोपी विरुद्ध कोणताही सकृतदर्शनी असा पुरावा नाही, तसेच आरोपीकडून गुन्ह्यास पूरक अशी कोणतीही जप्ती झालेली नसल्यामुळे त्यास जामिनावर मुक्त करावे असे मुद्दे मांडले त्यावरून न्यायमूर्तींनी 25,000/- रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे गीता मुळेकर यांनी काम पाहिले.