बीड,दि.२३: इशारा सभा: मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा झाली. यावेळी राज्य सरकारला इशारा देत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.
इशारा सभा
मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये इशारा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ यांच्या सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
आमरण उपोषणाला बसणार
राज्य सरकारला इशारा देत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
एकदा जर मोठा समुदाय खवळला तर…
कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं. कुणाला जाळपोळ करु द्यायची नाही. आम्हाला मुंबईला यायची हौस नाही, पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे. २० तारखेच्या आत आरक्षण देता आलं तर बघा. मी मेलो तरी चालेल मागे फिरणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. देशातील मोठी जात संपवण्याचा तुमचा घाट दिसतो. एकदा जर मोठा समुदाय खवळला तर तुमचा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय अस्तित्व साफ होईल. माझ्या मराठ्यांना डिवचू नका, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. सामंजस्याने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचं (छगन भुजबळ) ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर येणारं आंदोलन तुम्हाला जड जाईल. हा फक्त बीड जिल्हा आहे. अजून महाराष्ट्र बाकी आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घर बाहेर पडणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.