मुंबई,दि.27: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाला 20 जागांवर विजय मिळाला आहे. निकाल लागल्यानंतर अनेकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. यातच शिवसेनेचे (ठाकरे गट) पराभूत उमेदवारांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भेट घेतली.
महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला असला तरी हा विजय ‘ईव्हीएम’ घोटाळ्य़ामुळेच झाल्याच्या शेकडो तक्रारी करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ‘ईव्हीएम’ घोटाळय़ाच्या तक्रारींचा पाढाच वाचला. त्यामुळे संशयास्पद मतदान केंद्रांतील 5 टक्के ‘व्हीव्हीपॅट’ची फेरमोजणी करण्यासाठी तातडीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांना दिले.
महायुती सरकारच्या कारभारात जीवघेणी महागाई, प्रचंड भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱयांच्या आत्महत्यांमुळे महाराष्ट्र हवालदिल झाल्याने सरकारविरोधात जनतेमध्ये मोठी नाराजी होती. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ताबदल होण्याचा अंदाज राजकीय तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष निकाल महायुतीच्या बाजूने एकतर्फी लागल्यानंतर अनेक उमेदवारांकडून ‘ईव्हीएम’बाबत जाहीर तक्रारी केल्या जात असल्यामुळे निकालच संशयाच्या भोवऱयात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांच्या तक्रारी ऐकून घेत मार्गदर्शन केले. दरम्यान, शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढताना राज्यात 95 जागा लढवल्या. यामध्ये 20 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत, मात्र बहुतांश ठिकाणच्या पराभूत उमेदवारांकडून ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
उमेदवारांचा अधिकार
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पराभूत उमेदवारांना मतमोजणीबाबत कोणतीही तक्रार असली तर 5 टक्के व्हीव्हीपॅटच्या पुनर्मोजणीची मागणी करता येते. यासाठी मतमोजणीनंतर सहा दिवसांत निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे अर्ज करावा लागतो
काय आहेत तक्रारी?
शेकडो मतदारसंघांत प्रत्यक्ष मतदान आणि मशीनमध्ये तफावत
मतदान झालेल्या मशीनमध्ये चक्क शून्य मतदानाची नोंद
काही केंद्रांवर पाच ते सहा मशीनमध्ये एकसमान मते
काही उमेदवारांना स्वतःच्या कुटुंबाइतकीही मते पडली नाहीत
मशीनमधील घोळाबाबत निवडणूक कर्मचाऱ्यांकडूनच तक्रारी