भाजपाने शेअर केलेल्या व्हिडीओने खळबळ, भाजपाने केला व्हिडिओ डिलिट

0

मुंबई,दि.२८: ‘नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन,’ असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ महाराष्ट्र भाजपच्या एक्स अकाउंटवरून प्रसारित झाल्याने शुक्रवारी राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. एक तासानंतर हा व्हिडीओ डीलीट करण्यात आला; पण, यानिमित्ताने तर्कवितर्कांना उधाण आले.

मराठा आरक्षण, आमदार अपात्रता असे विषय ऐरणीवर असतानाच प्रदेश भाजपच्या अधिकृत एक्स हँडलवरून शुक्रवारी संध्याकाळी एक व्हिडीओ प्रसारित झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार का? अशी चर्चा सुरू झाली.

या व्हिडीओनंतर लगेच प्रतिक्रिया उमटल्या. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा उत्साह वाढविण्यासाठी भाजपने हा व्हिडीओ टाकला असावा, तो प्रचाराचा भाग असावा, असे शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. शिवसेनेचे दुसरे मंत्री उदय सामंत म्हणाले की, फडणवीस हे आधीच पुन्हा आलेले आहेत आणि आम्हाला घेऊन आलेले आहेत. राज्यात भूकंपाची शक्यता नाही. निवडणुका मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात लढणार, असे स्वत: फडणवीस यांनीच म्हटलेले आहे. भाजपचे आ. प्रसाद लाड म्हणाले की, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल.

व्हिडीओत काय?

‘नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन, दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी मी पुन्हा येईन,’ असे फडणवीस म्हणत असल्याचे व्हिडीओत दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभेत आणि प्रचारातही ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले होते. त्याचाच संदर्भ देण्यात आला आहे. त्याच्या बॅकग्राउंडला केजीएफ चित्रपटातले सुलतान हे गाणे वाजत आहे.

तर्कवितर्कांना उधाण

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीला गेले होते. या दौऱ्यात त्यांनी रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्याला जोडून आजच्या व्हिडीओबाबत बातम्या सुरू झाल्याने तर्कवितर्कांना अधिकच उधाण आले.

जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ याआधीही टाकलेला होता. त्यातून आमच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, हे देवेंद्र फडणवीस यांनीही वारंवार म्हटले आहे. त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये. – केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, प्रदेश भाजप


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here