मुंबई,दि.१५: Supriya Sule On Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पक्षातील बंडखोरीवर भाष्य केले आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केला आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, याबरोबरच त्यांना समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदंही मिळाली. या बंडखोरीबद्दल खासदार सुप्रिया सुळेंना ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात थेट प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी उत्तरं दिली. तसेच राष्ट्रवादी पक्ष फुटला नसल्याचं त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? | Supriya Sule On Khupte Tithe Gupte
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाय हे तुम्हाला मान्य आहे का?’ असं अवधूत गुप्तेने विचारल्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही आणि त्या पक्षाचे देशाचे अध्यक्ष पवारसाहेब आहेत, तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत.” तर राष्ट्रवादी पक्ष फुटला नसून त्यांच्या देशातील व राज्यातील अध्यक्षांची नावं यावेळी सुप्रिया सुळेंनी घेतली.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर…
या प्रश्नाचं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिल्यावर त्यांना आधीच्याच प्रश्नाला जोडून आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. “मग अजित पवार आणि त्यांच्याबरोबरचे आमदार कोण आहेत?” यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात काही निर्णय घेतले, त्यामुळे पक्षाने त्यांना नोटीस पाठवलेली आहे. आम्ही उत्तराची वाट पाहतोय.”
दरम्यान, सुप्रिया सुळे या कार्यक्रमाच्या आगामी भागात दिसणार आहेत. या शोच्या प्रोमोमध्ये सुप्रिया सुळे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. या रविवारी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी हा एपिसोड ‘झी मराठी’वर पाहायला मिळणार आहे.