सोलापूर,दि.२९: मध्य रेल्वे सोलापूर विभागातून धावणाऱ्या सोलापूर – मुंबई सिध्देश्वर एक्स्प्रेस, सोलापूर – पुणे हुतात्मा एक्स्प्रेससह अन्य एक्स्प्रेस गाड्या आज (शुक्रवार) पासून सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
सोलापूर विभागातील दौंड कुर्डुवाडी सेक्शनमधील भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेने सोलापूर विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्या १४ ऑक्टोबरपासून रद्द केल्या होत्या.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले भाळवणी- वाशिंबे दरम्यानचे दुहेरीकरणाचे काम सोमवारी पूर्ण झाले. त्यानंतर रेल्वेचे संरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी या दुहेरीकरणाच्या कामाची बुधवारी पाहणी केली. त्यानंतर या नव्या मार्गावरून रेल्वे धावण्यास सुरुवात झाली.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या सर्व गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज (शुक्रवार) पासून हुतात्मा सिध्देश्वरसह अन्य विशेष एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाडून देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे सेवा बंद असल्याने सोलापूरकरांची मोठी गैरसोय झाली होती. दिवाळी उत्सवाच्या तोंडावर रेल्वे सुरू होणार असल्याने मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या गाड्या सुरू होणार
मुंबई- गदग- मुंबई, मुंबई- लातूर मुंबई, मुंबई- बिदर- मुंबई, पनवेल- नांदेड- पनवेल, हैदराबाद- हडपसर- हैदराबाद, पुणे सोलापूर- पुणे ( हुतात्मा एक्स्प्रेस), सोलापूर- मुंबई- सोलापूर (सिध्देश्वर एक्स्प्रेस), म्हैसूर साईनगर शिर्डी विशेष एक्स्प्रेस.