Home राजकारण विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात ‘MCMC’ समिती गठीत

विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात ‘MCMC’ समिती गठीत

0

सोलापूर,दि.८: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (MCMC) गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी या समितीची स्थापना केली आहे.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन या समितीचे अध्यक्ष आहेत. उत्तर सोलापूर २४९ विधानसभा मतदारसंघाचे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी, सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सोमेश्वर पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. श्रीराम दगडू राऊत हे समितीचे सदस्य आहेत. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात सोशल मीडिया, केबल नेटवर्क, आकाशवाणी, एफएम रेडिओ, दूरदर्शन वाहिन्या आणि वृत्तपत्रांमधील निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे, जाहिरातींना नियमानुसार पूर्वपरवानगी देणे व ‘पेड न्यूज’च्या प्रकरणांवर लक्ष ठेवून कारवाई करणे ही या समितीची प्रमुख कामे आहेत.

समितीकडे प्राप्त होणाऱ्या जाहिरातींच्या अर्जांची छाननी करून पात्र जाहिरातींना मंजुरीचे प्रमाणपत्र तर नियमांत न बसणाऱ्या जाहिरातींना नामंजुरीचे पत्र दिले जाईल. राजकीय पक्ष व उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी या समितीकडून प्रमाणिकरण करून घेणे अनिवार्य आहे.

जाहिरात प्रमाणीकरणासाठी संपर्क साधना करण्याचे आवाहन:

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कार्यालय जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीमध्ये, तळमजल्यावर असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयात आहे. सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी राजकीय जाहिराती प्रमाणित करून घेण्यासाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.