सोलापूर,दि.९: सोलापूर येथील एका नामांकित खाजगी शिकवणी वर्गाच्या (क्लास) रकमेत अपहार केल्याचा आरोप असलेल्या शशीकांत इंगळे (रा. काळी मशिदीजवळ, सोलापूर) या कर्मचाऱ्याची मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केली.
नक्की प्रकरण काय होते?
फिर्यादी हे मागील ३५ वर्षांपासून अकौंटन्सीच्या खाजगी शिकवणीचा व्यवसाय करतात. सध्या बी. सी. बॉईज हॉस्टेल आणि मुलींच्या आयटीआय महाविद्यालयाजवळ असलेल्या सोलापूर हॉलमध्ये त्यांचा क्लास चालतो.Class मध्ये मागील २० वर्षांपासून वॉचमन व दोन क्लर्क असे एकूण तीन कर्मचारी कार्यरत होते. शशिकांत सदाशिव इंगळे व अन्य एक कर्मचारी क्लर्क म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्यांकडून फी स्वीकारणे, पावती देणे, पावती पुस्तकावर सही करणे, जमा रकमेची नोंद विद्यार्थ्यांच्या आय-कार्डावर, रजिस्टरवर व दैनंदिन रोजमेळ (डे बुक) पुस्तकात करून ती रक्कम दररोज फिर्यादीकडे जमा करणे, अशी त्यांच्या कामाची स्वरूप होते.
फिर्यादींनी जमा रकमेच्या नोंदींची शहानिशा करण्यासाठी काही विद्यार्थ्यांचे आय-कार्ड आणि पावत्या तपासल्या. त्यावेळी दोन्ही क्लर्कनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेऊन आय-कार्डावर नोंद केली व पावती दिली, मात्र डे बुकमध्ये कमी रक्कम दर्शवल्याचे किंवा काही नोंदी अजिबात न केल्याचे निदर्शनास आले. एका विद्यार्थिनीच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता. याशिवाय पावती पुस्तकांतील मूळ पावत्या आणि त्यांच्या स्थळप्रती पूर्णपणे फाडून काढल्याचे आढळले.
याबाबत चौकशी केली असता कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची कबुली दिल्याचा दावा फिर्यादींनी केला होता. पावती पुस्तके व डे बुकची तफावत तपासली असता, सुमारे ३ लाख ३३ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ४२०, ४०८ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात काय घडले?
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी आणि तपासाधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
मात्र, सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी घेतलेली फिर्यादीची उलटतपासणी या खटल्याला कलाटणी देणारी ठरली. उलटतपासणीत फिर्यादीने अनेक महत्त्वाच्या बाबी मान्य केल्या. तसेच, युक्तिवादाच्या वेळी आरोपीच्या वकिलांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे आणि सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे विचारात घेऊन, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी शशिकांत इंगळे यांची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. अभिजित इटकर, अॅड. नंदकुमार दुरगुडे, अॅड. गौरंग काकडे, अॅड. राम शिंदे, अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख आणि अॅड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.








