नागपूर,दि.१६: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रस्त्यावर आणि सभागृहात वातावरण तापलं आहे. अनेकदा या मुद्द्यावरुन, मुद्द्याआडून राजकारणही केलं जातं. त्यामुळेच, मराठा आरक्षणाच विषय अधिक गंभीर बनला असून एकीकडे सरकार आरक्षणा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत आहे. दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली मुदत संपत आहे. त्यामुळे, सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा सभागृहात चर्चेला आला आहे. यावेळी, बोलताना भाजपा आमदार श्वेता महाले यांनी मराठा आरक्षणासाठीचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं योगदान सांगितलं.
केवळ जातीवरच नाही तर त्यांच्या…
आमदार श्वेता महाले यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यात निघालेल्या ५८ मोर्चांचा संदर्भ देत मत मांडलं. ”मराठा आरक्षणासाठी जेव्हा मोर्चे निघाले, तेव्हा त्यांचे मनसुबे वेगळे होते. देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देऊच शकत नाही. त्यामुळे, आपण शांत राहा, केवळ आपली ताकद दाखवा, १०० टक्के फडणवीस सरकार अडचणीत येणार आहे. अध्यक्ष महोदय, त्या काळात फडणवीस साहेबांच्या जातीवरही काही लोकं गेले, केवळ जातीवरच नाही तर त्यांच्या वैयक्तिक कुटुंबापर्यंत गेले. मला सभागृहात शब्दही घेऊ वाटत नाहीत, इथपर्यंत काही मराठा नेत्यांनी बोलून दाखवलं,” असे म्हणत आमदार श्वेता महाले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा काहींचा आकस विधानसभा सभागृहात बोलून दाखवला.
हे सगळं राजकारण आहे, हे राजकारण कोण करंतय, हे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले, त्याला कोणी फंडींग केलंय हे सगळं महाराष्ट्राला कळतंय. कोणीही काहीही बोलून दाखवलं नाही. कारण, प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आणि प्रत्यक्षात ते कार्य त्यांनी करुन दाखवलं. त्यासाठी, मराठा समाजाच्या समन्वय समितीसोबत फडणवीस साहेब स्वत: मुख्यमंत्री असताना पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत बैठका घेत. हायकोर्टात हे आरक्षण टिकवण्यासाठी समन्यवकांसोबत चर्चा करुन युक्तीवाद कसा केला पाहिजे, कशारितीने हे आरक्षण हायकोर्टात टिकलं पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच, हायकोर्टात आरक्षण टिकलं. म्हणूनच, २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला मराठा समाजाने मतदाररुपी आशीर्वाद दिला, असेही आमदार महाले यांनी विधानसभेत बोलताना म्हटले.