सोलापूर,दि.१६: Shri Siddheshwar Sugar Factory: शेतकऱी मालक असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी प्रशासनाकडून पाडल्यानंतर शहर व जिल्ह्यात सोशल मीडियातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. मटका, जुगार, क्लब चालवणारे समाजात मोठ्या रुबाबात फिरतात. त्यांना सन्मानही मिळताना दिसतो. चारित्र्यवान, सत्यवचनी धर्मराज काडादी यांना विरोध करायचा म्हणून चिमणी पाडण्यात आली. जे पाच ते दहा लोकांना रोजगार देऊ शकत नाहीत, अशा व्यक्तींचा यात मोठा सहभाग होता. येणाऱ्या निवडणुकीत ‘सुभाष‘चा ‘विजय‘ अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया येत आहेत.
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना उभा केला. काडादी कुटुंबीयांनी हा सहकार तत्वावरील कारखाना जिल्ह्यातच नव्हे राज्यात आदर्शवत असा चालवून शहराच्या विकासात मोठी भर घातली.
हेही वाचा भाजपा उपमुख्यमंत्र्याची उद्धव ठाकरे यांना मोठी ऑफर
तुमच्या उन्मत सत्तेचा बुरुज बळीराजा असाच जमीनदोस्त करेल | Shri Siddheshwar Sugar Factory
कारखान्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. या कारखान्यावर हजारो कुटुंबीयांची उपजीविका होती. अशा आदर्शवत कारखान्याची चिमणी पाडल्याबद्दल सोशल मीडियातून शहर व जिल्ह्यातील विशेष करून तरुणांनी तीव्र भावना व्यक्त केला. ‘तुमच्या उन्मत सत्तेचा बुरुज बळीराजा असाच जमीनदोस्त करेल’ आजचा दिवस सोलापूरच्या इतिहासातला काळा दिवस असून, दळभद्री मानसिकतेचा जाहीर निषेध, आज फक्त चिमणी पडली नाही तर इथला कामगार देशोधडीला लागला आहे. त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम प्रशासनाकडून झाले आहे. फक्त सोलापूरकरांचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या असुरी आणि घातकी कृत्याकडे लागून राहिले होते.
जे कोणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष या कृत्यामध्ये सहभागी आहेत त्यांना त्यांची फळे लवकरच मिळतील. एखादी संस्था उभारण्यात तिला नावारूपास आणण्यास काय कष्ट करावे लागतात हे माहीत असते तर आजचे हे कृत्य कोणीही केले नसते.
शेतकऱी मालक असलेल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या…
शेतकऱी मालक असलेल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीच्या कारवाईने हजारो शेतकरीमालक व कामगारांना त्यांच्या घरावर नांगर फिरवून त्यांना रस्त्यावर आणले आहे. व्यक्तिगत व्देशातून आसुरी आनंद घेणाऱ्या काही व्यक्ती व लोकप्रतिनिधीची कीव वाटते. त्यांच्या ह्या विकृत मानसिकतेला काय म्हणावे हे समजत नाही. व्यक्तिगत द्वेष, वैर याला सामाजिक कार्यात व राजकारणात फार महत्व दिले जाऊ नये. परंतु गेल्या काही वर्षापासून सोलापुरात अशा पद्धतीचे हे राजकारण सुरू आहे.
ज्यांना सोलापूर जनतेने चार-पाच वेळा सातत्याने या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, मंत्रीपद दिले, ते विकासाचे राजकारण करण्यापेक्षा फक्त व्यक्ती व्देशाचे राजकारण करत आहेत. या मंडळींना व्यक्ती आणि संस्था यातला फरक समजतो का नाही हे समजत नाही. मी ज्या ज्या संस्थेवर प्रतिनिधित्व करतो आहे त्या संस्थेची प्रगती न पाहवल्याने अशा पद्धतीचे राजकारण केले जाते आहे. मी राजकारणात कुठेही सक्रिय नसताना जाणीवपूर्वक खूणशी प्रवृत्तीने हे मला व संस्थेला संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत सोलापूरची जनता हे बारकाईने पाहत आहे अशा नतद्रष्टाना पुढच्या काळात बाजूला टाकून द्यावे लागणार आहे आणि ते सोलापूरची जनता केल्याशिवाय राहणार नाही.
कालच्या कारवाईने सभासद शेतकरी व कामगार हे कौटुंबिक व मानसिक दृष्ट्या उध्वस्त झालेला आहे. त्यापैकी अनेकांनी अश्रू ढाळून दुःख व्यक्त केले. काही शेतकऱ्यांनी आपला उसाचा फड पेटवून आपले दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी धीर सोडू नये. माझे त्यांना सांगणे आहे की, जो अन्न्याय झाला, जे नुकसान झाले, संसार उध्वस्त झाले आहेत त्यासाठी संघटित होऊन कामाला लागू या.
या सर्व परिस्थितीवर मार्ग काढून मात करू या. मी सोबत आहेच. गेल्या दोन वर्षात ज्या पद्धतीने चांगले गाळप केले आहे त्याही पेक्षा पुढचे लक्ष ठेवून कामाला लागू या. ज्यांनी सिद्धेश्वराच्या शिखराला हात लावला आहे त्यांचे सिद्धेश्वरवर सोडून देऊ तो पाहून घेईल. कारखान्याने महाराष्ट्रातच एक चांगला प्रकल्प उभा केला आहे त्याचे यश या मंडळींना पाहवत नाही म्हणून असा त्रास दिला जातोय. त्यामुळे हतबल न होता संघटित होऊन आपले वैभव जोमाने उभे करू या. याकरता मी कुटुंबप्रमुख म्हणून आपणासोबत कार्यरत आहेच. श्री स्वामी समर्थ देखील आपणा सर्वांच्या पाठीशी आहेत.
धर्मराज काडादी