मुंबई,दि.१६: दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना खुली ऑफर दिली आहे. राज्यात अलिकडच्या काळात झालेल्या दंगली, राडे आणि अनेक ठिकाणी निर्माण झालेला तणाव यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. अहमदनगर, अकोला, अमळनेर आणि कोल्हापुरात गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या दंगलींवरून सत्ताधारी (भाजपा-शिंदे गट) आणि विरोधक (महाविकास आघाडी) एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत.
विधान सभेचे विरोधी पक्षनते अजित पवार यावरून म्हणाले की, राज्यात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठे अशी दंगल झाली नाही, परंतु भाजपा-शिंदे गटाच्या सरकारच्या काळात असं घडत आहे. अजित पवारांच्या या आरोपांना शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. तसेच त्यांना युतीत येण्याची थेट ऑफर दिली आहे.
दीपक केसरकर म्हणाले, दंगली करणारेच सत्तेत बसले की दंगली होणारच नाहीत. त्यांनी (महाविकास आघाडीने) दंगली केल्या असं मी म्हणणार नाही. परंतु कोल्हापुरात दंगल झाली तेव्हा तिथे दगड मारणारा एकही माणूस कोल्हापुरातला नव्हता. ही सगळी माणसं बाहेरून आली होती. या लोकांना कोल्हापुरात कोणी पाठवलं? दंगलींचे अंदाज यांचे लोक दोन-दोन महिने आधीच कसे काय लावतात.
काय म्हणाले दीपक केसरकर?
दीपक केसरकर म्हणाले, मला अजित दादांबद्दल आदर आहे. तसेच दादा एक विरोधी पक्षाचे नेते आहेत, किमान त्यांनी तरी अशी वक्तव्ये करू नयेत. संजय राऊत रोज बोलत असतात. त्याने आम्हाला काही वाटत नाही. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु दादा बोलतात त्यावेळी जनता ते गांभीर्याने घेते. त्यामुळे सामाजिक ऐक्य राखण्यासाठी दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील.
दीपक केसरकर यांची अजित पवार यांना खुली ऑफर
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आमची अपेक्षा अशी आहे की, दादांनी या सरकारमध्ये यावं, दादा एक कार्यक्षम मंत्री आहेत. ते या सरकारमध्ये आले तर आम्हाला आनंद होईल. दादांसंदर्भात सध्या काय राजकारण घडतंय हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे. परंतु ते खूप कार्यक्षम मंत्री आहेत. मी त्या पक्षात होतो, मला माहिती आहे. त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेचा फायदा हा राज्यातील जनतेला मिळाला पाहिजे. त्यासाठी चांगलं माध्यम त्यांनी निवडलं पाहिजे. ते माध्यम म्हणजे मोदी साहेब हेच आहेत. हे मला ठामपणे सांगायचं आहे.