सोलापूर,दि.3: भाजपा नेत्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी (Shobha Tai Banshetti) मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपने आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांना उमेदवारी दिली आहे. देशमुख यांना उमेदवारी देण्यास विरोध असतानाही भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शोभाताई बनशेट्टी, संजय साळुंखे, अमर बिराजदार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने (शरद पवार गट) माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांना उमेदवारी दिली आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्यात लढत होणार आहे. अशातच शोभाताई बनशेट्टी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शोभाताई यांच्या निर्णयावर शहर उत्तरचे भवितव्य ठरणार आहे. शोभाताई बनशेट्टी या उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे बनशेट्टी परिवाराकडून सोलापूर वार्ताला माहिती मिळत आहे. शोभाताई बनशेट्टी या आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे कळत आहे.
शोभाताई बनशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना मोठा फटका बसणार आहे. महेश कोठे यांच्यासारखा तगडा उमेदवार देशमुख यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरला असताना शोभाताई यांच्यामुळे ही निवडणूक चुरसीची होणार आहे. शोभाताई यांच्या पाठीमागे भाजपाचे असंतुष्ट नेते आणि कार्यकर्ते आहेत. बनशेट्टी यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे.
शोभाताई बनशेट्टी यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास भाजपाला मोठा फटका बसणार आहे. शोभाताई बनशेट्टी यांच्यामुळे महेश कोठे यांना ही निवडणूक सुकर होणार आहे. शहर उत्तरची निवडणूक तिरंगी होणार आहे. असे झाल्यास शोभाताई यांच्या निर्णयाचा फायदा त्यांना स्वतःला होणार की महेश कोठे यांना होणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 4 तारीख ही शेवटची आहे. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.