मुंबई,दि.5: Sharad Pawar Resigns: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला. लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. पवारांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला. शरद पवारांनी पुढील अध्यक्ष निवडण्यासाठी समितीची नेमणूक केली होती.
उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत झालेला निर्णय प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर सांगितला. “शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं. असा ठराव आम्ही आज पारित केला आहे. आम्ही हा ठराव घेऊन पवारांना भेटायचा प्रयत्न करु. आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येतं असून तेच पक्षाचे अध्यक्ष राहावेत”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न | Sharad Pawar Resigns
शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत आज सकाळी राष्ट्रवादी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. यावेळी भिवंडी येथील राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षाने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि इतर कार्यकर्त्यांनी वेळीच सतर्कता दाखवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
राष्ट्रवादीच्या ठरावात नेमकं काय म्हटलंय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते आ.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवारसाहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
2 मेच्या दिवशी शरद पवार यांनी राजीनामा दिला होता. त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी पक्षाचा अध्यक्ष पदावर दुसऱ्याने राहावं अशी सूचना केली होती. समिती देखील गठित केली होती. मी पक्षाचा उपाध्यक्ष असल्यामुळे मला त्याची जबाबदारी दिली होती.
त्यादिवशी ते जे काही बोलले त्यामुळे आम्ही स्तब्ध झालो होतो. ते असा राजीनामा निर्णय जाहीर करतील याची कोणाला कल्पना नव्हती. सर्वांची भावना शरद पवार यांनी अध्यक्ष राहावं अशी होती. चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतर अनेकजण त्यांना भेटून गेले.
सर्वांनी मिळून विनंती केली की देशाला तुमची गरज आहे. नाव आणि अधारस्तंभ तुम्हीच आहात. देशात सन्मानित नेता फक्त शरद पवार आहेत. परवा पंजाबला आम्ही गेलो होतो त्यावेळी पंजाबचे शेतकरी भेटले ते म्हणत होते पवारांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम विसरु शकत नाही. मागील 2 ते 3 दिवसांत देशातील दिग्गज नेते शरद पवार यांना भेटून जात होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची भावना पाहायला मिळत होती. पक्षात अनेक मान्यवर राज्यांत आणि देशातील अनेकजण विनंती करत होते की त्यांनी पद सोडू नये.
देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे तो भेटायला येत आहे. आम्ही त्यांच्या भावना दुर्लक्षित करु शकत नाही. त्यांनी आम्हाला विचारात न घेता निर्णय घेतला. त्यामुळे स्वाभाविक आहे की दररोज भेटून आम्ही विनंती करत होतो की त्यांनी निर्णय मागे घ्यावा.
आम्ही आज ठराव पारित केला आहे. आम्ही हा ठराव घेऊन पवारांना भेटायचा प्रयत्न करु. आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत असून तेच पक्षाचे अध्यक्ष राहावेत.