छत्रपती संभाजीनगर,दि.6: विरोधी पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. शरद पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या भाषणामध्ये शरद पवारांनी भाजप सरकारवर निशाणा साधला सोबतच त्यांनी विरोधी पक्षांनाही पुढचा धोका सांगितला आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरूनही शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले शरद पवार? | Sharad Pawar
‘आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 350 वर्षांपूर्वी महाराजांनी शिवराज्याभिषेक झाला. हे राज्य त्यांचं आहे, देशात अनेक राजे झाले, मोगल, यादव राजा, अशोक यांची राज्य देशात अनेक वर्ष चालली, मात्र शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांचं राज्य नाही, रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं,’ असं शरद पवार म्हणाले.
‘संवाद असता तर मोठे प्रश्न सोडवणं शक्य झालं असतं, संवादाचा अभाव आहे, मोठ्या नेत्यांचं संसदेत येणंजाणं नसतं. प्रमुखांचं दर्शन झालं असतं तर बरं वाटतं. नवीन वास्तूची गरज काय? हा प्रश्न आहे. सभागृहाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले, पण निर्णय झाला, संवाद नव्हता. पक्षाच्या नेत्यांशी सुसंवाद झाला नाही. आम्हाला निर्णय माहिती नव्हता, तो निर्णय सुसंवाद साधून घेता आला असता,’ असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.
‘नवीन वास्तू झाली, राष्ट्रपतींना बोलावण्याची मागणी केली, मात्र ती मान्य झाली नाही, म्हणून आम्ही गेलो नाही. टीव्हीवर आम्ही कार्यक्रम पाहिला, जेव्हा आधीच्या संसदेचं उद्घाटन झालं त्यावेळी सर्व मंत्र्यांचा फोटो काढण्यात आला, आताचा फोटो बघा, साधू संतांचा फोटो पाहायला मिळाला. राष्ट्रपती सोडा, उपराष्ट्रपतीदेखील दिसले नाहीत, सभागृहाचे प्रमुख ते आहेत. प्रश्न विचारला उत्तर मिळालं नाही, माहिती घेतली तर उद्घाटनात त्यांना महत्त्व मिळालं असतं, पंतप्रधानांना कमी महत्त्व मिळालं असतं. सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला. संसदेचं महत्त्व आम्ही ठेवले नाही, तर सर्वसामान्यांना आस्था कशी राहिल? संसदेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे? हे कळतं आणि ते चांगलं नाही,’ अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
‘देशातल्या सर्वसामान्य व्यक्तीवर मला विश्वास आहे. राजकारणी चुकले की ते मार्ग दाखवतात. इंदिरा गांधींसारख्या जबरदस्त नेत्यांचा पराभव जनतेने केला, ज्याच्या हातात सत्ता दिली, त्यावेळी जबाबदारी पाळली नाही म्हणून मोरारजी देसाई यांची सत्ता गेली. लोक शहाणपणाचे निर्णय घेतात,’ असं विधान शरद पवारांनी केलं आहे.
‘केरळ, तामिळनाडूमध्ये भाजपचं सरकार आहे का? कर्नाटकमध्येही राज्य नाही. अनेक गोष्टी कधीही पाहिल्या नाही त्या पाहायला मिळाल्या, तरीही भाजपचा पराभव झाला, त्यांच्या हातातून अनेक ठिकाणी सत्ता गेली, गोव्यामध्ये त्यांचा पराभव झाला तरीही त्यांनी सत्ता हातात घेतली,’ अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली.
…तर वेगळा निर्णय जनता घेऊ शकते
‘आपल्याला जागरूक होण्याची गरज आहे. विरोधी पक्षाने एकत्र येऊन विश्वासदर्शक निर्णय घेतले तर लोक पर्याय बदलतील, मात्र आम्ही चुकलो तर वेगळा निर्णय जनता घेऊ शकते,’ असं म्हणत शरद पवारांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही धोक्याचा इशारा दिला आहे.