Sharad Pawar: निवडणूक आयोगाला शरद पवार यांनी सांगितले राष्ट्रवादी…

0

मुंबई,दि.८: अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे. पक्षात दोन गट नाहीत, शिवाय कोणताही वाद नाही,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडली आहे. राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड आणि विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी सोमवारी याला दुजोरा दिला. तसेच १७ ऑगस्टपासून शरद पवार बीड शहरापासून राज्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असतील, असे सांगत राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह आमचे आहे, असा दावा अजित पवार गटातर्फे त्यांचे नेते प्रफुल पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केला आहे. या पत्राबाबत आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यावर शरद पवार यांनी उत्तर पाठवले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असून, त्यात दोन गट नाहीत. आयोगाने त्या पत्राची दखल घेण्याची गरज नव्हती. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर दावा करणे अकाली आणि खेदजनक आहे. अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेली मागणी फेटाळावी,’ असे त्यांनी उत्तरात म्हटल्याचे सूत्रांकडून समजते.

‘राष्ट्रवादी पक्ष आमचा असल्याचा दावा अजित पवार गट करू शकत नाही. त्यांनी ५ जुलैला निवडणूक आयोगाला पत्र पाठवले असून ३० तारखेला निवड झाली असल्याचे म्हटले आहे. मात्र शरद पवार हेच विठ्ठल हे भाष्य केले आहे. नंतर अध्यक्ष बदलला अशी विरोधाभासाची भूमिका अजित पवार घेऊ शकत नाहीत. पक्षात संभ्रम निर्माण करायचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे,’ असे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आयोगाकडे कागदपत्रांची मागणी

‘निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर देण्यास सांगितले होते. त्यानुसार हे उत्तर देण्यात आले आहे. प्रफुल पटेल यांनी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. मग अजित पवार गटाची बैठक कधी घेतली, त्यासंदर्भातील काय पुरावे आहेत, ते सर्व पुरावे, कागदपत्रे आम्ही आयोगाकडे मागितले आहेत,’ असे आव्हाड म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here