नाशिक,दि.24: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना इशारा दिला आहे. संजय राऊत म्हणाले, ‘इंडिया आघाडीचे 240 खासदार एकत्र संसदेत प्रवेश करतील तेव्हा मोदी शहा व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल की विरोधी पक्ष काय असतो 240 चे 275 कधी होतील हे मोदी शहा यांना कळणार ही नाही.’
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपा व शिंदे गटावर टीका केली. सोमवार पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे सर्व खासदार हे एकत्र संसदेत प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील. हे सर्व 240 खासदार एकत्र संसदेत प्रवेश करतील व प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असेल. संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आहोत हा संदेश घेऊन हे खासदार संसदेत प्रवेश करतील. त्यावेळी मोदी शहा व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल की विरोधी पक्ष काय असतो. असे राऊत म्हणाले.
गेल्या दहा वर्षात ज्या विरोधी पक्षाला चिरडण्याचा द़डपण्याचा प्रयत्न केला. तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेत येणार आहे. आता संसदेत विरोधी पक्षातील 240 खासदारांचा आवाज घुमणार . मोदी व शहा समोर प्रथमच एक विरोधी पक्ष नेता असेल. आमच्या 240 चे 275 कधी होतील हे त्यांना कळणार ही नाही, असे संजय राऊत म्हणाले.