Home महाराष्ट्र मशाल विझली, धनुष्यबाण हाती! ‘या’ आमदाराचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मशाल विझली, धनुष्यबाण हाती! ‘या’ आमदाराचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

0

मुंबई,दि.३०: महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंप थांबायचं नाव घेत नाहीये. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अवघ्या आठ दिवसांत उद्धव ठाकरे यांना दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा राजकीय धक्का दिला आहे. ठाकरे कुटुंबाचे अत्यंत निकटवर्तीय आणि वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी अखेर ‘मशाल’ विझवून शिंदे गटाचे ‘धनुष्यबाण’ हातामध्ये घेतले आहे.

केवळ पक्षांतरच नाही, तर शिंदे गटात प्रवेश करताच सचिन अहिर यांना थेट विधान परिषदेचे उपसभापतीपद बहाल करण्यात आले असून, त्यांनी या पदासाठीचा अर्जही दाखल केला आहे.

‘मातोश्री’च्या विश्वासूला आपल्या गळाला कसं लावलं?

सचिन अहिर हे केवळ एक आमदार नव्हते, तर ते वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहायचे. खासदार फुटल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदारही फुटणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या, त्यावर अहिर यांच्या बंडामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

नुकत्याच झालेल्या एका हाय-व्होल्टेज घडामोडीत, सचिन अहिर जेव्हा उपसभापतीपदाचा अर्ज दाखल करत होते, तेव्हा तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या दृश्याने ठाकरे गटातील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे.

गिरणगावातील कामगार नेता ते उपसभापती: सचिन अहिर यांचा प्रवास

सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आणि चढ-उतारांचा राहिला आहे:

राजकीय सुरुवात: दक्षिण मुंबईतील (गिरणगाव) बंद पडलेल्या मिल्सच्या युनियनच्या माध्यमातून कामगारांचे नेतृत्व करत त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले.

पवार पॅटर्न: शरद पवार यांनी अहिर यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी संधी दिली. राष्ट्रवादीत असताना त्यांनी मंत्रिपद आणि मुंबई अध्यक्षपदासारखी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. (त्यांची ओळख डॉन अरुण गवळी यांचे भाचे म्हणूनही आहे).

ठाकरे गटात प्रवेश: २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला होता. मात्र, २०१९ मध्ये जेव्हा आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडणूक लढवायची होती, तेव्हा राजकीय समीकरणे बदलली. अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आदित्य यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

 बक्षीस आणि बंड: आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुनील शिंदे आणि सचिन अहिर या दोघांनाही विधान परिषदेवर पाठवले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.