मुंबई,दि.16: दैनिक सामना रोखठोकमधून भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली आणि राज्यात सत्तांतर झाले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल कधीही लागू शकतो. अनेकांच्या मते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होऊ शकतात.
दैनिक सामना रोखठोक | Saamana Rokhthok
महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचा ‘सीझन-2’ येणार काय? यावर चर्चा सुरू आहेत. शिंदे गटाचे 16 आमदार बाद होतील. त्याची भरपाई म्हणून राष्ट्रवादीचे आमदार फोडले जातील. अजित पवारांपासून हसन मुश्रीफांपर्यंत ‘ईडी’चा ससेमिरा लावला गेला आहे. त्याचा शेवट काय होणार?
लवकरच फोडाफोडीचा सीझन-2
‘बिग बॉस’, ‘कौन बनेगा करोडपती’ अशा कार्यक्रमांचे ‘सीझन- 1’, ‘सीझन- 2’ असे टीव्हीवर सुरूच असतात. तसे सीझन आता महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीबाबत सुरू आहेत. शिवसेना फोडली हा ‘सीझन-1’, आता राष्ट्रवादी फोडण्याचा ‘सीझन-2’ आला आहे, अशी चर्चा जोरात आहे. फोडाफोडी म्हणजेच लोकशाही हे आता काही लोकांनी ठरवूनच टाकले आहे. हिंदुस्थानी लोकशाहीची कशी धूळधाण उडवली जात आहे ते आता रोजच दिसते. कालपर्यंत लोकांची मते विकत घेतली जात होती. आता लोकांनी मते देऊन निवडून दिलेल्या आमदार-खासदारांना सहज विकत घेण्यास आजचे सत्ताधारी उतरले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमांवर एक माहिती बुधवारी प्रसिद्ध केली. त्या सांगतात, ”आज मंत्रालयात कामानिमित्ताने गेले.
तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटाचे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या 15 आमदारांसह लगेच भाजपबरोबर जाणार आहेत. बघू, आणखी किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची!” श्रीमती दमानिया या मंत्रालयात गेल्या व त्यांना ही गुप्त माहिती मिळाली ही रंजक बाब आहे. जी बातमी महाराष्ट्र आणि देशाला बऱ्याच दिवसांपासून माहिती आहे, फक्त ही ‘फेक न्यूज’ आहे की आणखी काही हे सत्य कसे शोधायचे? भाऊबंदकी हा मानवजातीला दिलेला शाप असेल, परंतु सत्तेसाठी माणसे कोणत्या थराला जातात याचे अनेक धडे इतिहासात आणि वर्तमानातही आपण पाहत असतो. महाराष्ट्राला व मराठ्यांना दुहीचा शाप आहे व ती दुही घरातूनच सुरू होते. शिवछत्रपतींनी शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अतुल परामाने सबंध देशात दरारा निर्माण केला. त्यांचे चिरंजीव संभाजीराजे हेदेखील पराक्रमी होते, शूरवीर होते. एका विशिष्ट परिस्थितीत दुर्दैवाने ते मोगलांना मिळाले, मात्र त्याच संभाजीराजांनी शेवटी स्वराज्य व धर्म यासाठी बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान आजही प्रेरणादायीच आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा श्री. अजित पवार यांनीच करायला हवा. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉण्डरिंगच्या आरोपांचे काय झाले? की ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या? असे दहशत व दबावाचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते. बाबा आमटे हयात असताना एक ज्येष्ठ पत्रकार त्यांना भेटायला गेले. त्यांच्यात गप्पा झाल्या. ”देशाचा एकही प्रश्न सुटतो असे वाटत नाही…” असे ते पत्रकार म्हणाले. त्यावर बाबांनी उत्तर दिले, ”कसे वाटेल? राजकीय पक्ष कोणतेच प्रश्न सोडवत तर नाहीत, उलट तेच नवनवे प्रश्न निर्माण करीत आहेत.” आज महाराष्ट्रात व देशात तेच सुरू आहे. सत्तेवर आज कोण आहेत? जे असायला हवेत ते नाहीत. प्रश्न वाढवायचे काम करणाऱ्यांना ते सोडवा असे सांगायचे?