नवी दिल्ली,दि.१८: राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. पुढील महिन्यात या निवडणुकांसाठी मतदान होणार असून त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांमध्ये चढाओढ असणार आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सरकारं असल्यामुळे तिथेही तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेसचे वायनाडमधील खासदार राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेसचे अदाणी प्रकरणावरून आरोप
गौतम अदाणी यांच्यासंदर्भात काँग्रेसकडून २० हजार कोटींचे आरोप सत्ताधारी भाजपावर व थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले जात आहेत. थेट संसदेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदाणी यांचे एकत्र प्रवास करतानाचे फोटो दाखवून मोदींवर अदाणींना मदत करत असल्याचा, त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये सध्या चांगलीच जुंपली असताना पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पुन्हा एकदा अदाणी प्रकरणावरून मोदींना लक्ष्य केलं आहे. तसेच, यंदा आकडा २० हजार कोटींवरून तब्बल ३२ हजार कोटींपर्यंत वाढल्याचं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधींनी या पत्रकार परिषदेत ब्रिटनमधील फायनान्शियल टाईम्स वर्तमानपत्रातील एका बातमीचा संदर्भ दिला. ‘अदाणी व कोळशाच्या किमतीचं गूढ’ अशा मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या या बातमीमध्ये गौतम अदाणी इंडोनेशियातून खरेदी करत असलेल्या कोळशाची किंमत भारतात येईपर्यंत दुप्पट होत असल्याचा दावा केला आहे. त्याचा संदर्भ देत राहुल गांधींनी “ही बातमी कोणतंही सरकार पाडू शकते”, असं विधान केलं आहे.
“फायनान्शियल टाईम्स ऑफ लंडनमध्ये एक बातमी प्रकाशित झालीये ज्यात त्यांनी म्हटलंय की ‘अदाणी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात. तो कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट झालेली असते’. या माध्यमातून त्यांनी सामान्य गरीब भारतीयांच्या खिशातून जवळपास १२ हजार कोटी रुपये उकळले आहेत. आपल्याकडे विजेचे दर वाढत जातात. अदाणी किंमती वाढवतात, गरीबांच्या खिशांमधून ते पैसा काढत आहेत. ही बातमी कोणतंही सरकार कोसळवू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला वारंवार वाचवत आहेत, अशा माणसाकडून ही थेट चोरी आहे”, असा थेट आरोप राहुल गांधींनी केला आहे.
३२ हजार कोटी
“आधी आम्ही २० हजार कोटींचा उल्लेख करून विचारलं होतं की हा पैसा कुणाचा आहे? कुठून आला? आता कळतंय की २० हजार कोटी हा आकडा चुकीचा होता. त्यात आता १२ हजार कोटी आणखी वाढले आहेत. त्यामुळे आता हा आकडा ३२ हजार कोटी झाला आहे”, असंही राहुल गांधींनी नमूद केलं आहे.