Home देश राहुल गांधींची ‘मेलडी’वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका म्हणाले, जनतेला उपदेश आणि…

राहुल गांधींची ‘मेलडी’वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका म्हणाले, जनतेला उपदेश आणि…

0
राहुल गांधींची 'मेलडी'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका म्हणाले, जनतेला उपदेश आणि…

सोलापूर,दि.२०: Rahul Gandhi Criticizes Narendra Modi | “देश सध्या एका मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एकीकडे देशातील शेतकरी, मजूर आणि सामान्य जनता महागाईने होरपळत असताना, आपले पंतप्रधान मात्र परदेशात जाऊन चॉकलेट वाटण्यात आणि रील बनवण्यात व्यस्त आहेत,” असा थेट आणि गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान गौरीगंज येथे आयोजित कार्यकर्ते मेळाव्यात बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचे वाभाडे काढले.

पंतप्रधांच्या ‘त्या’ रीलवरून राहुल गांधींचा हल्लाबोल | Rahul Gandhi Criticizes Narendra Modi

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांना (मेलडी – Melody) चॉकलेटचा पुडा भेट देताना दिसत आहेत. यावरूनच निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, “तिकडे देशात गरिबांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि इकडे आपले पंतप्रधान परदेशात जाऊन चॉकलेट वाटत हसत-हसत रील बनवत आहेत; हे नेतृत्व नसून निव्वळ राजकीय नौटंकी आहे.”

“जनतेला उपदेश आणि स्वतः उधळपट्टी”

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या विधानांमधील विसंगतीवर बोट ठेवले. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी टीव्हीवर येतात आणि देशातील जनतेला सांगतात की- सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास टाळा आणि इलेक्ट्रिक गाड्या वापरा. पण हा उपदेश देऊन झाल्यावर ते स्वतः मात्र हजारो कोटींच्या व्हीआयपी विमानात बसून एकामागून एक परदेश दौरे करतात. सरकार स्वतःच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी देशातील आर्थिक अपयशाचे ओझे सर्वसामान्यांच्या खांद्यावर टाकत आहे.”

देशात येणार मोठे ‘आर्थिक वादळ’

आगामी काळातील परिस्थितीविषयी देशवासियांना सावध करताना राहुल गांधी म्हणाले, “मी तुम्हाला आजच सांगतोय, देशाच्या समोर एक मोठे आर्थिक वादळ  (Economic Storm) उभे ठाकले आहे. येत्या काही महिन्यांत महागाई प्रचंड वाढेल. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी आणि तांदूळ या सर्वांचे भाव गगनाला भिडतील. अगदी शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळणेही कठीण होईल.”

“अर्थव्यवस्था अदानी-अंबानींच्या हाती”

या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी भारताची संपूर्ण आर्थिक व्यवस्था मोजक्या उद्योगपतींच्या – अंबानी, अदानी हाती सोपवली आहे. जेव्हा हे आर्थिक संकट देशावर कोसळेल, तेव्हा मोदी आणि अमित शाह हात वर करतील; पण ही सर्व परिस्थिती केवळ पंतप्रधान, अमित शाह आणि आरएसएस (RSS) च्या चुकीच्या धोरणांमुळे ओढवली आहे.”

राहुल गांधी यांनी गौरीगंज येथील सभेत चॉकलेट, सोने खरेदी आणि पंतप्रधानांच्या विमानाचा संदर्भ देत केलेल्या या खोचक टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला असून, राजकीय वर्तुळात यावरून नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.