मुंबई,दि.4: नुकत्याच लागलेल्या 4 राज्यांच्या निवडणूक निकालांवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी पीके यांनी चार कारणेही दिली, ज्यामुळे भाजपचा तीन राज्यात मोठा विजय झाला. प्रशांत किशोर म्हणाले की, फक्त नरेंद्र मोदींमुळेच भाजपला मते मिळत नाहीत, तर त्यांना मते मिळण्याची चार कारणे आहेत. हे काँग्रेसला समजून घ्यावे लागेल. फक्त आरोप करुन जनता कोणाला मत देत नाही.
त्यांना पराभूत करू शकत नाहीत…
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा मोठा विजय झाला. काहीजण या निकालाचे श्रेय पीएम मोदींना देत आहेत, तर काहीजण काँग्रेसच्या अपयशामुळे भाजपला फायदा झाल्याचे बोलत आहेत. दरम्यान, जन सूराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी यावर स्पष्ट मत व्यक्त केले आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, विरोधकांना भाजपचा पराभव करायचा असेल, तर त्यांना आधी त्यांची ताकद समजून घ्यावी लागेल. लोक भाजपला मत का देतात? जोपर्यंत तुम्ही त्यांची ताकद समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना पराभूत करू शकत नाहीत.
भाजपला मते मिळण्याची चार कारणे आहेत
पहिले – हिंदुत्व ही त्यांची विचारधारा आहे, त्याच्याशी संबंधित एक मोठा वर्ग भाजपला मत देतो.
दुसरे– सध्या नव्या राष्ट्रवादाची चर्चा सुरू झाली आहे. भारत विश्वगुरू झाल्याचे सर्वत्र ऐकायला मिळते. मोदींनी संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली. दहशतवाद्यांचा खात्मा केला, या सर्व गोष्टी ऐकायला मिळतात. या राष्ट्रवादाच्या भावनेमुळेच भाजपला मते मिळतात.
तिसरे– केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांचा एक मोठा वर्ग, मग ती किसान स्वानिधी योजना असो, गृहनिर्माण योजना असो, त्यातील निधी थेट लाभार्थ्यांना दिला जातो.
चौथे– भाजपची संघटनात्मक ताकद खूप जास्त आहे. भाजपची संघटना आर्थिकदृष्ट्यादेखील खूप सक्षम आहे. या संघटनेसमोर इतर पक्षांनी आपली संघटना मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, अशी चार कारणे प्रशांत किशोर यांनी सांगितली.
जोपर्यंत तुम्ही यावर काम करत नाही, तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागेल. एक-दोन ठिकाणी विजय मिळाला तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात काँग्रेसचा विजय झाला, ही मते काँग्रेसला गेलेली नाहीत. तिथल्या तत्कालीन सरकारांविरोधात लोकांचा रोष होता, ज्यमुळे काँग्रेस विजयी झाले. लोकांना केसीआरच्या विरोधात मतदान करायचे होते, म्हणून त्यांनी काँग्रेसला केले, अशी स्पष्टोक्ती पीकेंनी व्यक्त केली.