Home राजकारण नागरिकांच्या मदतीला धावून आली ‘लाखात एक सोलापुरची लेक’

नागरिकांच्या मदतीला धावून आली ‘लाखात एक सोलापुरची लेक’

0

सोलापूर,दि.१६: जुळे सोलापूर भागातील गणेश बिल्डर्स (स्कीम नं. ३) येथील रहिवाशांना ८ ऑगस्टपासून अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. येथील वसाहतीतील नागरिकांच्या ये-जा करण्याचा मुख्य रस्ता शेजारील जागेच्या मालकाने पूर्णपणे उखडून टाकला आहे. यासंदर्भात सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. नीता जोशी यांनी महापालिका व पोलिस प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे गणेश बिल्डर्समधील नागरिकांनी १५ ऑगस्ट रोजी महापालिकेसमोर आंदोलन छेडले. त्यावेळी महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी ॲड. नीता जोशी यांच्याकडून निवेदन स्वीकारले होते. परंतु, आज (१६ ऑगस्ट) पुन्हा रस्ता खोदण्यात आल्यामुळे नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत. नागरिकांनी ही समस्या मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे मांडल्याचे समजते. मात्र याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही.

या समस्येची दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी काल (१५ ऑगस्ट) गणेश बिल्डर्स परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. आज पुन्हा खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि नागरिकांच्या हक्कासाठी थेट आंदोलन सुरू केले. काँग्रेस नेते चेतन नरोटेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

गणेश बिल्डर्स स्कीम क्रमांक ३ येथील सुमारे १५० कुटुंबांतील ६०० रहिवाशांचा गेल्या पाच दिवसांपासून रस्ता आणि ड्रेनेजचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागातील नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना आपल्या दैनंदिन कामासाठी देखील बाहेर पडता येत नसल्याने सोबतच येथील ड्रेनेजची झालेली बिकट अवस्था यामुळे येथील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

“येथील रहिवाशांना जोपर्यंत पर्यायी रस्ता दिला जात नाही, तोपर्यंत आपण येथून हलणार नाही,” असा आक्रमक पवित्रा खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या बिकट प्रसंगात नागरिकांच्या मदतीला धावून आलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांचे रूप पाहून ‘लाखात एक सोलापूरची लेक’ नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याची भावना व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.