सोलापूर,दि.10: Pramod Gaikwad Case: सोलापूर शहरातील वैभव वाघे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड (Pramod Gaikwad) सहसात आरोपींनी प्रस्तुत प्रकरणात तपास पूर्ण झाल्यामुळे जामीन मिळण्यासाठी आरोपींनी अर्ज दाखल केलेला आहे. यात मूळफिर्यादी व सरकारपक्षाकडून प्रमोद गायकवाड याच्यासह इतर आरोपींच्या जामीन अर्जास विरोध दर्शवला आहे तर आरोपी नंबर 1 ते 3 यांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण केला आहे. इतर आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या युक्तिवादा करिता सुनावणी ठेवलेली आहे. (Pramod Gaikwad Solapur)
यात हकीकत अशी की, दि. ०१/०१/२०२५ रोजी गल्लीतील जुन्या भांडणाचा राग मनात धरुन वैभव वाघे व इतर चौघांना सर्व आरोपींनी मिळून घातक हत्यारांनी जबर मारहाण केली होती. यात वैभव वाघेचा उपचारादरम्यान ०६/०१/२०२५ रोजी मृत्यु झाला. त्याबाबत दि. १/१/२०२५ रोजी सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होवून प्रमोद गायकवाड (Pramod Gaikwad) यास व इतर ८ जणांना अटक झाली.
तेंव्हापासून आजतागायत सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या प्रकरणात पोलीसांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्याची प्राथमिक सुनावणी सत्र न्यायालयासमोर सुरु झाली आहे. यात प्रमोद गायकवाडसह सात आरोपींना जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
सदर खटल्यातील आरोपी प्रमोद गायकवाड यांच्यासह इतर आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जास मूळफिर्यादीच्या वकिलांनी मूळ फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून विरोध दर्शविला आहे तर सरकारपक्षातार्फे आरोपी नंबर 1 ते 3 यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला आहे तर इतर आरोपींच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करिता यात पुढील सुनावणी दि.,11/9/2025 रोजी नेमलेली आहे.
यात मूळफिर्यादीतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रूपनर, सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार तर आरोपीतर्फे शशी कुलकर्णी व आर आर पाटील, अॅड. किरण सराते हे काम पाहत आहेत.