मुंबई,दि.२६: राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली होती. मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काहींनी तर वेगळ व्हायचा निर्णय 38 व्या वर्षी घेतला. वसंतदादा पाटलांना बाजूला केलं गेलं. वसंतदादा चांगलं नेतृत्व होतं. त्यांनाही बाजूला केलं गेलं, अशी खोचक टीका करतानाच मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आधी घेतला. त्यामुळे तुम्ही मला समजून घेतलं पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं.
शरद पवारांचे प्रत्युत्तर
आम्ही केले ते बंड नव्हते, आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला धरून घेतलेला तो निर्णय होता. त्याबद्दल कोणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केले असेल, तर त्याबद्दलही तक्रार नाही. मात्र, पक्षाची निर्मिती कशी झाली? संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्यावर भाष्य तरी कशाला करायचे? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
शरद पवार म्हणाले, अनेक वर्षे मी बारामती व त्या भागात साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कुणी जावे आणि कुणी जबाबादारी घ्यावी, यात लक्ष घातले नाही. कुणी कुणाचे ऐकावे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्ष म्हणून मी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली. यात मला आनंद आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.