सोलापूर,दि.१३: अजित पवारांच्या भेटीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनं राज्यातील राजकारणात पुन्हा काही हालचाली सुरू झाल्यात का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलही हजर होते. या भेटीबाबत कुणालाही काही कळवण्यात आले नव्हते. चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत उरलेल्या आमदार, खासदारांनी आमच्यासोबत यावे. आमच्या निर्णयाला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आपण येणार नसाल तर पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि अन्य खासदारांना तरी पाठवा, अशी गळ अजित पवार यांनी यावेळी घातली. या बैठकीची पूर्वकल्पना दिल्लीला होती. सगळ्या परिस्थितीवर दिल्लीचे वरिष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारीक लक्ष ठेवून होते. पूर्वनियोजित आखणीनुसार हे चालू होते. अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांना भेटतील. त्यावेळी कदाचित त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही असतील, असेही सांगण्यात येत आहे.
अजित पवारांच्या भेटीवर शरद पवार म्हणाले, “अजित पवार हा माझा…”
सदर भेटीवर आता स्वत: शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय? असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे आणि पवार कुटुंबातील मी वडिलधारा माणूस आहे, त्यामुळे मला कुणी भेटायला आलं किंवा मी कुणाला भेटायला बोलावलं, हा चर्चेचा विषय बनू शकत नाही, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं. राष्ट्रवादी पक्ष कधीच भाजपासोबत जाणार नाही. राष्ट्रवादीतील एक गट भाजपामध्ये गेला असला तरी मूळ पक्ष भाजपासोबत जाणार नाही. विरोधकांच्या इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं देखील शरद पवारांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पक्षात एकोपा रहावा. कुठलीही कटुता येऊ नये, यासाठी तुम्ही सुप्रिया सुळे यांना आमच्यासोबत पाठवा. त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळेल. पक्ष एकसंघ राहील. भाजप आणि राष्ट्रवादी असे मिळून आपण सत्तेत राहू शकतो. जे आमदार अजून सोबत आलेले नाहीत, त्यांनादेखील तुम्ही सोबत पाठवा. सुप्रिया सुळे सोबत आल्या, आपण आम्हाला आशीर्वाद दिला असे सांगितले तर सगळ्यांच्याच दृष्टीने ते चांगले होईल, अशी गळ अजित पवार यांनी घातल्याचे वृत्त आहे. मात्र, शरद पवार यांनी या गोष्टीला ठाम नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.