मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा…’

0

मुंबई,दि.२५: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या तीन दिवसांनंतर उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांमध्ये शवासनावरून शनिवारी वाक्युद्ध रंगले. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांवरील ईडीची कारवाई आणि भाजपाकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे-फडणवीसवर हल्ला चढवला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा देवेंद्र फडणवीसांकडे असल्याचं सांगत ठाकरेंना इशारा दिला. ते शनिवारी (२४ जून) मुंबईत मराठा मंदिर अमृत महोत्सवानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले, “सरकारवर दररोज खालच्या पातळीवरील आरोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्वांवर आरोप केले जात आहेत, पातळीसोडून बोललं जात आहे. हे सर्वजण पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी माझा नातू रुद्रांशलाही राजकारणात ओढलं गेलं. त्या लहान मुलाला राजकारण काय कळतं.”

“मी त्यांची लायकी म्हणणार नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा या माजी मुख्यमंत्र्यांना मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना मदत केली आहे. त्यांनी याची किमान जाणीव तरी ठेवली पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीसांबरोबर मी काम केलं आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. हे कसला आरोप करत आहेत,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा…

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिट्ठा आहे. केवळ बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि किंबहुना आत्ताही त्यांनी उद्धव ठाकरेंना मदत केली. हा केवळ कृतघ्नपणा आहे.”

“मलाही बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मी अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. मी त्या गोष्टी इथं बोलू इच्छित नाही. मात्र, ‘समझनेवाले को इशारा काफी हैं’. मुंबईत चौकशी सुरू आहे त्यावरूनच हे सर्व सुरू आहे. ही चौकशी सरकार करत नाहीये. ही चौकशी ईडी करत आहे. हे का घाबरत आहेत? कर नाही तर, डर कशाला? त्यांनी चौकशीला सामोरं जावं,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here