Devendra Fadnavis On Sharad Pawar: ‘इतिहासात हे लिहून ठेवलं आहे की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली…’ देवेंद्र फडणवीस

0

मुंबई,दि.२६: Devendra Fadnavis On Sharad Pawar: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला असताना आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातही तसेच दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. आधी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मुत्सद्देगिरीवरून टोला लगावल्यानंतर त्यावर शरद पवारांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला होता. आता माध्यमांशी बोलताना पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

काय आहे वाद? | Devendra Fadnavis On Sharad Pawar

देवेंद्र फडणवीसांनी रविवारी भाजपाच्या एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर टीका करण्यासाठी शरद पवारांच्या पुलोद सरकारच्या प्रयोगाचा दाखला दिला. “१९७८ मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?” असा सवाल फडणवीसांनी केला.

शरद पवार म्हणाले होते… | Sharad Pawar

फडणवीसांच्या या विधानाबाबत पत्रकारांनी शरद पवारांना सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यावर शरद पवारांनी खोचक उत्तर दिलं. “१९७७ साली आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी भाजपा माझ्यासोबत होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस लहान असतील. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र म्हणाले…

दरम्यान, आता शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा टोला लगावला आहे. “शरद पवार म्हणाले ते खरं आहे की १९७७ मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. पण मी काल जे बोललो, ते एकतर शरद पवारांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी ते त्यांना अस्वस्थ करणारं होतं. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“१९७८ साली शरद पवारांनी वसंतदादा पाटलांबरोबर ते मंत्री होते त्यावेळी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले ४० लोक बाहेर काढले आणि भाजपाबरोबर त्यांनी सरकार तयार केलं. आता एकनाथ शिंदे तर आमच्याबरोबरच निवडून आले होते. ते तिथून ५० लोक घेऊन बाहेर पडले. त्यांनी आमच्याबरोबर सरकार स्थापन केलं. मग शरद पवारांनी तयार केलेलं सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी तयार केलेलं सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते? मी कुठेही शरद पवारांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही. एकनाथ शिंदेंची केस तर मेरिटची आहे. एकनाथ शिंदे आमच्याबरोबर युतीत निवडून आले. शरद पवार तर काँग्रेसबरोबर निवडून आले होते आणि नंतर भाजपाबरोबर आले”, असं फडणवीस म्हणाले.

“माझं म्हणणं एवढंच आहे की मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, त्यामुळे इतिहास बदलत नाही. कुणीही जन्माला आलं, नाही आलं, कधी आलं यावर इतिहास ठरत नसतो. इतिहासात हे लिहून ठेवलं आहे की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ४० लोकांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि भाजपाबरोबर सरकार तयार केलं. तेच मी सांगितलंय”, असंही फडणवीस म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here