Home महाराष्ट्र पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल आणि ओमराजे निंबाळकर यांचे मोठं विधान

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल आणि ओमराजे निंबाळकर यांचे मोठं विधान

0

सोलापूर,दि.२०: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर आज (२० जून २०२६) अंतिम निकाल लागला आहे. या खटल्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबाला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे.

सीबीआय विशेष न्यायालयाचे (CBI Special Court) न्यायमूर्ती एस. आर. नावंदर (कोर्ट क्र. ५५) यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. या खटल्याचा मुख्य आधार असलेला माफीचा साक्षीदार हा अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत ठरल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याच कारणास्तव, संशयाचा फायदा (Benefit of Doubt) देत न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

न्यायालयातील नाट्य: बिहारच्या तुरुंगात असलेला मुख्य शूटर पिंटू सिंग याला पोलिसांनी उशिरा हजर केल्यामुळे काही काळ वातावरणात सस्पेन्स वाढला होता. अखेर कडेकोट पोलीस बंदोबस्तात निकालवाचन पूर्ण झाले.

ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरीची चर्चा; ओमराजे निंबाळकर यांचे मोठे विधान

या कायदेशीर धक्क्यासोबतच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ठाकरे गटाने तातडीने व्हीप जारी करून बोलावलेल्या बैठकीला या ६ खासदारांनी दांडी मारल्याने या चर्चांना अधिक उधाण आले.

या ६ खासदारांमध्ये नाव असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर या संपूर्ण प्रकरणावर आणि सध्या सुरू असलेल्या चर्चांवर आपले मोठे विधान केले आहे. आगामी काळात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का? यावर त्यांनी थेट नकार न देता सूचक वक्तव्य केले.

ओमराजे निंबाळकर यांचे विधान: “शिवसेना शिंदे गटात जाण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम राजकीय निर्णय घेतलेला नाही. मी आधी माझ्या मतदारसंघात जाईन, तिथल्या जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करेन आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.”

खटल्याचा निकाल आणि त्यातच ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याबाबत घेतलेली ही सावध भूमिका, यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी कलाटणी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.