Home राजकारण जोडरस्त्यांची डोकेदुखी अन् कोटींचा खर्च भारी – रस्त्याअभावी सोलापूरकर अडचणीत भारी!

जोडरस्त्यांची डोकेदुखी अन् कोटींचा खर्च भारी – रस्त्याअभावी सोलापूरकर अडचणीत भारी!

0
रस्त्याअभावी सोलापूरकर अडचणीत

सोलापूर,दि.५: शहरात सतत होणारी वाहतुकीची कोंडी आणि नागरी सुविधा देताना येणाऱ्या विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाच्या कामाला महापालिकेने तात्पुरता ब्रेक लावला आहे. आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता होईपर्यंत या महत्त्वाच्या दळणवळण मार्गाच्या प्रवासाला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कामाला स्थगिती देण्याचे थेट आदेश दिले. “रस्ता तयार झाल्यानंतर पाणी किंवा ड्रेनेजसाठी तो पुन्हा खोदावा लागू नये. सर्व संबंधित विभागांनी आपसात उत्तम समन्वय ठेवून आधी भूमिगत सोयी-सुविधांची कामे पूर्ण करावीत आणि मगच रस्त्याच्या अंतिम कामाला हात लावावा,” असे स्पष्ट निर्देश महापालिकेने दिले आहेत. यासंदर्भात महापालिकेने एमएसआयडीसीला (MSIDC) आधीच नोटीस बजावली होती.

२६ जोडरस्ते अन् कोट्यवधींच्या खर्चाचा पेच

पत्रकारांशी बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी या स्थगितीमागची प्रमुख कारणे स्पष्ट केली. मुख्य रस्ता उंच झाल्यामुळे परिसरातील सुमारे २६ जोडरस्त्यांच्या (कनेक्टिव्हिटी) जोडणीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. याशिवाय ८६ पैकी १६ ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या खाली दबले गेल्याने त्यांची उंची वाढवून ते नव्याने बांधावे लागणार आहेत.

मुख्य पिण्याच्या पाण्याची ५०० मिमी व्यासाची जलवाहिनी, ड्रेनेज लाईन आणि स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्याशिवाय अंतिम रस्ता होणार नाही. तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जोडरस्त्यांवर मुरूम टाकून तात्पुरती वाहतूक व्यवस्था केली जाईल. या अतिरिक्त कामांसाठी लागणारा ८ ते १० कोटी रुपयांचा खर्च मूळ प्रकल्पातच समाविष्ट केला जाणार असून, महापालिका यासाठी एकही रुपयाचा स्वतंत्र निधी देणार नाही; हा सर्व खर्च एमएसआयडीसीलाच करावा लागणार आहे.

तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती

महापौर कार्यालयात झालेल्या या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता उमेश झगडे, उपायुक्त गिरीश पंडित यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, उपअभियंता नीलकंठ मठपती, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी आणि सहाय्यक अभियंता महादेव इंगळे यांनी रस्त्याचे नियोजन, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि चौकांच्या सुधारणांबाबत सादरीकरण केले. शहराच्या भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून कामात कोणतीही घाई न करता, दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारा रस्ता उभारण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.