Home महाराष्ट्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया भाजपमध्ये प्रवेश करणार?

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया भाजपमध्ये प्रवेश करणार?

0

सोलापूर,दि.१८: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘शिखर पहारिया फाउंडेशन’च्या वतीने प्रसारमाध्यमे आणि डिजिटल माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, या शुभेच्छांमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्टीकरण फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले आहे.

सामाजिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या समजून घेणे आणि गरजूंच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हीच शिखर पहारिया फाउंडेशनची मुख्य भूमिका असल्याचे फाउंडेशनचे राज सलगर यांनी स्पष्ट केले.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचे नातू शिखर पहारिया (Shikhar Pahariya) यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्यानंतर आणि शहरात फाउंडेशनचे शुभेच्छा बॅनर लागल्यानंतर, पहारिया भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राज सलगर यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

या पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, शिखर पहारिया फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिक तसेच अडचणीत असलेल्या गरजू व्यक्तींच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचवणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हाच फाउंडेशनच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे.

फाउंडेशनची सध्याची भूमिका ही केवळ सामाजिक कार्यापुरतीच मर्यादित आहे. कोणतीही राजकीय विचारधारा स्वीकारणे, राजकीय भूमिका घेणे अथवा आगामी काळात निवडणूक लढवणे याबाबत कोणताही विचार किंवा चर्चा झालेली नाही. नागरिकांच्या प्रश्नांवर काम करणे आणि त्यांना वेळेवर मदतीचा हात देणे, यालाच आमचे प्राधान्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आवाहन करण्यात आल्यामुळे, एका सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून या डिजिटल शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. यामागे कोणताही राजकीय हेतू नसून केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सलगर यांनी स्पष्ट केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.