Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटलांना टोला अन् मोदींना सल्ला; राज ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्ला!

चंद्रकांत पाटलांना टोला अन् मोदींना सल्ला; राज ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्ला!

0

मुंबई,दि.१: सध्याच्या बदलत्या युगात नव्या ‘जेन झी’ (Gen Z) पिढीचा विचार करून राजकीय नेत्यांनी आपली विचारसरणी बदलली पाहिजे, असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले. जुन्या भ्रामक कल्पना बाजूला सारून शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा योग्य विचार करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर बोचरी टीका केली. तसेच, सोशल मीडियावरील वाढत्या ट्रोलिंग संस्कृतीवरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.

डोक्याला तेल चोपडण्यावरून चंद्रकांत पाटलांवर निशाना

राज ठाकरे म्हणाले की, सध्याच्या काळात नव्या पिढीला अपेक्षित असलेल्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. “आमच्या काळात आई सांगायची की रात्री डोक्याला तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. पण एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपड चोपडलं, तरी त्याला बुद्धी आली नाही. या माणसाचा प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो,” अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटलांचा उपरोधात्मक समाचार घेतला.

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात जाऊनही मंत्री महोदयांच्या विचारात फरक पडला नसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी त्यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले. “आंदोलनात फेकलेल्या दगडांवरील ‘फूटप्रिंट्स’ आधारशी लिंक केले जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणतात. मला त्यांच्याच मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स पाहायचे आहेत. आपण महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आहोत याचे भान ठेवून जग कुठे चालले आहे याचा विचार त्यांनी करायला हवा. अशी माणसे शिक्षणमंत्री झाल्यावर नव्या पिढीचा पारा चढणार नाही तर काय होणार?” असा सवाल त्यांनी केला.

‘जे पेरले तेच उगवले’; पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच एका व्हिडिओद्वारे स्वतःबद्दल आणि आपल्या आईबद्दल वापरल्या जाणाऱ्या अयोग्य भाषेवर खंत व्यक्त केली होती. यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, कोणाबाबतही किंवा कोणाच्या कुटुंबाबाबत खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणे चुकीचेच आहे आणि पंतप्रधानांचे म्हणणे पूर्णपणे बरोबर आहे.

परंतु, पंतप्रधानांना सल्ला देताना ते पुढे म्हणाले, “हीच गोष्ट तुम्ही तुमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि समर्थकांनाही सांगायला हवी. गेल्या १२ वर्षांत ही संस्कृती कोणी सुरू केली? महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून ते विरोधक आणि कलाकारांपर्यंत सर्वांना लक्ष्य करण्यासाठी भाजपची ‘ट्रोल टीम’ काम करत आहे. ते कोणत्या भाषेत बोलतात? तुम्ही जे पेरले आहे तेच आज उगवले असून ते तुमच्या अंगावर येत आहे. दुसऱ्यांनाही आई असते, हे पंतप्रधानांनी आपल्या लोकांनाही समजावून सांगावे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.