मुंबई,दि.१४: मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार आणि राज्यातील अत्यंत श्रीमंत लोकप्रतिनिधी पराग शाह (MLA Parag Shah) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार तब्बल ३,३०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असणारे आमदार शाह चक्क भिकाऱ्याच्या वेशात घाटकोपरच्या रस्त्यांवर भीक मागताना दिसल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरुवातीला नागरिकांमध्ये मोठा गोंधळ आणि तर्कवितर्क सुरू झाले होते. मात्र, यामागचे खरे कारण आता स्पष्ट झाले आहे. जैन धर्माच्या चातुर्मासानिमित्त पराग शाह यांचे धर्मगुरू राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज यांनी त्यांना अहंकार नष्ट करण्यासाठी आणि गरिबीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एक दिवस भिक्षुकाचे जिणे जगण्याचा सल्ला दिला होता.
गुरूंच्या आदेशाचे पालन करत आमदार शाह यांनी स्वतःची महागडी वाहने, सुरक्षारक्षक आणि व्हीआयपी लवाजमा बाजूला ठेवला. चेहऱ्यावर विशेष मेक-अप करून आणि अंगावर फाटके-जुने कपडे परिधान करून त्यांनी आपला लुक पूर्णपणे बदलला.
नागरिकांनी ओळखलेच नाही
वेषांतर करून पराग शाह यांनी स्वतःच्याच घाटकोपर परिसरात काही तास रस्त्यावर घालवले. भिकाऱ्याच्या रूपात त्यांनी लोकांकडे मदत मागितली. या काळात काहींनी त्यांना खाण्यास दिले, तर काहींनी दुर्लक्ष करत पुढे निघून जाणे पसंत केले. विशेष म्हणजे, परिसरात फिरत असताना एकाही नागरिकाला किंवा कार्यकर्त्याला आपल्याच भागाचे अब्जाधीश आमदार समोर उभे आहेत, याची साधी शंकाही आली नाही.
भीक मागून मिळालेल्या अन्नातून त्यांनी आपले पोट भरले आणि गरिबी तसेच समाजातील उपेक्षेचा प्रत्यक्ष आत्मानुभव घेतला. हा संपूर्ण प्रयोग आटोपल्यानंतर त्यांनी वेषांतर उतरवून आपला अनुभव गुरूंसमोर मांडला.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर पसरल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींकडून गुरूंच्या आज्ञेचे पालन आणि सामान्य माणसाच्या वेदना जाणून घेण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक केले जात आहे.








